`टी-२०`चा डबलडोस! पुढच्या दोन वर्षात दोन वर्ल्ड कप, आयसीसीची घोषणा
आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे.
मुंबई : आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. २०२१ सालचा टी-२० वर्ल्ड कप ठरल्याप्रमाणे भारतातच होणार आहे. तर २०२२ सालचा टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात खेळवला जाईल. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियातला टी-२० वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतर आयसीसीपुढे २०२१ सालचा भारतात होणारा टी-२० वर्ल्ड ऑस्ट्रेलियात खेळवण्याचा पर्याय होता. पण आयसीसीने भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपला हात न लावता ऑस्ट्रेलियाला २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनाची संधी दिली. २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपच्या मॅचची ठिकाणं मात्र अजून ठरलेली नाहीत.
२०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपनंतर लगेच २०२३ साली भारतामध्ये ५० ओव्हरचा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ दरम्यान होणारा महिलांचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कपही २०२२ सालापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट बंद होतं. मागच्याच महिन्यात वेस्ट इंडिजची टीम इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजनंतर आता पाकिस्तानची टीमही इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये सध्या पहिली टेस्ट मॅच सुरू आहे.
टीम इंडिया मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये शेवटची मैदानात उतरली होती. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आली होती, पण कोरोनामुळे ही सीरिजही रद्द करण्यात आली.
कोरोना व्हायरसमुळे भारतात मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली. अखेर ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयपीएल स्पर्धा रंगणार आहे.