२०२३चा वर्ल्ड कप या देशामध्ये होणार
२०२१ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : २०२१ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
२०२३ सालचा वर्ल्ड कप फक्त भारतामध्येच होणार आहे. याआधी म्हणजेच १९८७, १९९६ आणि २०११ ला झालेल्या वर्ल्ड कपच्या मॅच भारताबरोबरच शेजारच्या देशांमध्येही खेळवण्यात आल्या होत्या. मागच्या स्पर्धांप्रमाणे २०२३ वर्ल्ड कपमध्येही १० टीम सहभागी होतील. यातल्या क्रमवारीमधल्या पहिल्या आठ टीम थेट वर्ल्ड कपमध्ये पात्र होतील, तर उरलेल्या दोन टीम्सना २०२२ मध्ये पात्रता फेरी खेळावी लागेल.
याआधी २०११ मध्ये भारत-श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारतानं श्रीलंकेला हरवलं होतं. १९८३ आणि २०११मध्ये भारतानं वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
२०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळवला गेला होता. या स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला हरवत पाचव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. १९९२ नंतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलियात क्रिकेट वर्ल्ड कप खेळवण्यात आला. २०१९चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे.