ढाका : भारत दौऱ्याच्या फक्त १ आठवडा आधी बांगलादेशचे क्रिकेटपटू संपावर गेले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याच प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी दिला आहे. त्यामुळे बांगलादेशचा भारत दौरा संकटात आला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० आणि टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. सीरिजची पहिली मॅच ३ नोव्हेंबरला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश्च्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार शाकिब अल हसन, तमीम इकबाल आणि मुशफिकूर रहीम सोमवारी सकाळी ११ वाजता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या ११ मागण्या बोर्डाकडे दिल्या आणि संपाची घोषणा केली.


बांगलादेश भारत दौऱ्यावर ३ मॅचची टी-२० आणि २ मॅचची टेस्ट सीरिज खेळणार आङे. ३ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत दौऱ्यासाठी बांगलादेशने टी-२० टीमची घोषणा केली आहे.


बांगलादेशची टीम


शाकिब अल हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकूर रहीम, महमदुल्लाह, आफिफ हुसेन, मोसदेक हुसेन, अमीनुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन हुसेन, मुस्तफिजूर रहमान, शफीऊल इस्लाम


बांगलादेशी खेळाडूंच्या मागण्या


१ क्रिकेट वेलफेयर असोसिएशन ऑफ बांगलादेशचे अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. बांगलादेशच्या खेळा़डूंनी नव्या अध्यक्ष आणि सचिवांची निवड करावी.


२ ढाका प्रिमियर लीग या स्थानिक स्पर्धेत खेळाडूंच्या मानधनात मर्यादा नसावी. खेळाडूंना खूप कमी मानधन मिळतं.


३ बांगलादेश प्रिमियर लीग फ्रॅन्चायजी फॉरमॅटमध्ये व्हावी. स्थानिक खेळाडूंनाही परदेशी खेळाडूंएवढच मानधन मिळावं.


४ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळाडूंचं मानधन १ लाख रुपये करण्यात यावं. सध्या हे मानधन ३५ हजार रुपये आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या खेळाडूंचा दैनिक भत्ता ५० टक्क्यांनी वाढवावा. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूला सध्या १५०० टाका (बांगलादेशी चलन) मिळतात.


५ वार्षिक करारामध्ये खेळाडूंची संख्या वाढवावी. मागच्या ३ वर्षात खेळाडूंच्या करारातली रक्कम वाढवण्यात आली नाही. ही रक्कम वाढवण्यात यावी.


६ स्थानिक प्रशिक्षक, फिजियोथेरपीस्ट, ट्रेनर आणि मैदानात काम करणाऱ्यांचे पगार वाढवण्यात यावे.


७ ढाका प्रिमियर लीग (५० ओव्हरची स्पर्धा) आणि बांगलादेश प्रिमियर लीग (टी-२० स्पर्धा) यांच्याशिवाय आणखी स्थानिक स्पर्धा खेळवण्यात याव्या.


८ स्थानिक क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक निश्चित करण्यात यावं.


९ ढाका प्रिमियर लीग आणि बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना वेळेत मानधन देण्यात यावं.


१० खेळाडूंना परदेशातल्या २ पेक्षा जास्त लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी.