`ही नवीन भूमिका...`, कॅप्टन झाल्यानंतर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, `मी कधीच...`
Suryakumar Yadav First Reaction After Named As Captain: हार्दिक पांड्या किंवा शुभमन गिलला कर्णधारपदी नियुक्त करण्याऐवजी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) गळ्यात कर्णधारपदाची माळ घालत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून सूर्यकुमार यादवनेही यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Suryakumar Yadav First Reaction After Named As Captain: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी (India Tour Sri Lanka 2024) टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. या महिन्याच्या शेवटी सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव तीन टी-20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करेल. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे रोहित शर्मानंतर भारतीय टी-20 संघाची धुरा कोणाकडे असेल याचं उत्तर मिळालं आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये सूर्यकुमारचं दिर्घकाळ भारताचा कर्णधार राहणार का यासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य बीसीसीआयकडून करण्यात आलेलं नसलं तरी सध्याची निवड ही 2026 चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊनच केल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातही हार्दिक पांड्याचा संघात समावेश असूनही सूर्यकुमारकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असणारा सूर्यकुमार यादव हा दिर्घकाळ टी-20 चा कर्णधार राहू शकतो असे संकेत मिळत आहेत. कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर सूर्यकुमारने पहिली प्रतिक्रिया नोंदवली असून त्याची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
सूर्यकुमारला मिळतोय पाठिंबा, चाहत्यांना सुखद धक्का
सूर्युकमार यादवने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:ला भारतीय जर्सीमधील एक फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. एकीकडे काही चाहत्यांनी हार्दिकलाच कर्णधार बनवायला हवं होतं असं मत नोंदवलं असलं तरी विशेष बाब म्हणजे कोणीही सूर्यकुमारविरुद्ध अपशब्द वापरलाय किंवा त्याचा अपमान केलाय असं पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळेच सूर्यकुमारची निवड चाहत्यांना खटकली आहे असं नसलं तरी हार्दिकच्या चाहत्यांची बीसीसीआयच्या निर्णयामुळे निराशा झाली आहे हे मात्र नक्की. दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी आकाश ठेंगणं झालं आहे अशी स्थिती आहे. मागील काही आठवड्यांमध्ये अगदी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सूर्याने पकडलेला भन्नाट झेल असो किंवा वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन असो किंवा आता नव्याने मिळालेली जबाबदारी असो सारं काही एखाद्या गोड स्वप्नासारखं घडत आहे. दरम्यान सूर्यकुमारनेही नवी जबाबदारी अंगावर पडल्यानंतर पहिल्यांदाच यासंदर्भात प्रतिक्रीया नोंदवली आहे.
कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार काय म्हणाला?
सूर्यकुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चा इंडियन जर्सीमधील हसतानाचा फोटो शेअर करत सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. तसेच नव्या जबाबदारीबद्दलही तो या पोस्टमधून व्यक्त झाला आहे. "तुमच्याकडून मिळालेलं प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे खूप खूप आभार. मागील काही आठवडे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. मी खरोखरच या साऱ्यासाठी फार कृतज्ञ आहे. देशासाठी खेळणे ही सर्वात खास भावना आहे जी मी कधीच शब्दात वर्णन करू शकणार नाही. ही नवीन भूमिका तिच्यासोबत खूप सारी जबाबदारी, उत्साह आणि ऊर्जा घेऊन आली आहे. मला तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत राहतील अशी अपेक्षा करतो. या सर्व प्रसिद्धीचा करता धरता देवच आहे, खरंच देव महान आहे," अशा शब्दांमध्ये सूर्यकुमारने कॅप्शनमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तुम्हाला माहितीये का? सूर्यकुमार होता केकेआरचा उपकर्णधार
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 7 टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं असून त्यापैकी 5 सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचं एकदा नेतृत्व केलं असून हा सामनाही त्याने जिंकून दिला आहे. मुंबईच्या संघात येण्यापूर्वी सूर्यकुमार सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झालेल्या गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा उपकर्णधारही राहिला आहे.