पॉटचेफस्टरूम : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट मॅच या कायमच हाय व्होल्टेज होतात. त्यातच ही मॅच वर्ल्ड कपची असेल, तर मात्र दोन्ही टीममधला तणाव आणखी वाढतो. अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भारताचा फास्ट बॉलर सुशांत मिश्रा याने मैदानात केलेल्या वर्तणुकीमुळे सगळ्यांची मनं जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डावखुरा फास्ट बॉलर सुशांत मिश्रा याने टाकलेला बाऊन्सर पाकिस्तानचा बॅट्समन हैदर अलीच्या खांद्याला लागला. बॉल लागल्यानंतर हैदर अली मैदानातच बसला. यानंतर सुशांत मिश्राने हैदर अलीजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. सुशांत मिश्राच्या या वागणुकीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतातल्याच नाही तर पाकिस्तानमधल्या क्रिकेट चाहत्यांनी सुशांत मिश्राच्या खिलाडू वृत्तीची दाद दिली आहे.






अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. यशस्वी जयस्वालचं नाबाद शतक आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकामुळे भारताने ही मॅच १० विकेटने जिंकली आणि फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला. पाकिस्तानने ठेवलेल्या १७३ रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने ३५.२ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 


या मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण भारतीय बॉलरनी पाकिस्तानला वारंवार धक्के दिले. सुशांत मिश्राने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिष्णोईला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्थव अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.