IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने (Team India) मालिका 2-0 अशी खिशात घातलीय. टीम इंडियाच्या या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अष्टपैलू शिवम दुबेने (Shivam Dubey). अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात (Ind vs Afg T20) शिवमने दोन षटकात केवळ 9 धावादेत 1 विकेट घेतली. तर फलंदाजी करताने त्याने 40 षटकात 60 धावा ठोकल्या. इंदोर टी20 सामन्यातही त्याने एक विकेट घेतली. या सामन्यात त्याने अवघ्या 32 चेंडूत 63 धावा केल्या. सलग दोन सामन्यात केलेल्या शानदार खेळीने शिवम दुबेने टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियात आपला दावा मजबूत केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याला पर्याय
शिवम दुबेकडे हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) पर्याच म्हणून पाहिलं जात आहे. शिवम मध्यगती गोलंदाजी करतो. तर मधल्या फळीत तो आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातही शिवमची कामगिरी अशीच सुरु राहिली तर त्याचं टी20 विश्वचषक खेळणं जवळपास निश्चित मानलं जातंय. पण शिवम दुबेच्या एन्ट्रीने ईशान किशन, तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यरचं संघातील स्थान मात्र धोक्यात येऊ शकतं. 


वास्तविक टीम इंडियात सध्या एकेका जागेसाठी दोन ते तीन खेळाडू रांगेत आहेत. अशात 15 खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणं हे प्रत्येक खेळाडूसाठी आव्हान आहे. बोटावर मोजता येईल इतक्याच खेळाडूंचं स्थान टी20 विश्वचषकासाठीच्या संघात निश्चित मानलं जातंय. 


ईशान, श्रेयसची सुट्टी?
शिवम दुबे हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. टीम इंडियात सलामीसाठी रोहित शर्माबोरबर यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाड किंवा शुभमन गिलचा पर्याय आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव यांची जागा निश्चित मानली जातेय. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांडया फलंदाजीला येतो. यानंतर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर केएल राहुल, जितेश शर्मा, रिंकू सिंह, रवींद्र जडेजा यांचा नंबर लागतो. अशात शिवम दुबेचा संघात समावेश झाल्यास श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि तिलकवर्माची सु्ट्टी पक्की आहे. 


IPL 2022 नंतर प्रकाशझोतात
शिवम दुबेने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण गेल्या चार वर्षात त्याला टीम इंडिआत फारशी संधी मिळाली नाही. कामगिरीत सातत्या न राखता आल्याने शिवम संघातून आत-बाहेर होत राहिला. शिवम टीम इंडियासाठी 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला असून यात त्याने 275 धावा केल्या आहेत. तीन अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. तर गेल्या चार वर्षात शिवम केवळ एक एकदिवसीय सामना खेळला असून यात त्याने केवळ 9 धावा केल्या. 


शिवम दुबे खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला तो आयपीएल 2022 हंगामात. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या शिवने या हंगामात 156 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 418 धावा केल्या. विशेष म्हणजे या हंगामात त्याने सर्वाधिक षटकार लगावले. आयपीएल 2022 मध्ये शिवमने 12 चौकार आणि तब्बल 35 षटकार ठोकले. आयपीएलमधल्या या कामगिरीचा फायदा शिवमला झाला आणि गेल्या वर्षी त्याची टीम इंडियाच्या टी20 संघात वर्णी लागली.