मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. भारताने ठेवलेल्या २५६ रनच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता केला. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी नाबाद शतकी खेळी केली. भारताची बॉलिंग सुरु असताना केएल राहुल याने विकेट कीपिंग केली. ऋषभ पंत टीममध्ये असतानाही राहुल विकेट कीपिंग का करतोय? असा प्रश्न उपस्थित झाला. पण बॅटिंग करत असताना दुखापत झाल्यामुळे पंत विकेट कीपिंगला येऊ शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतने बॅटिंग करताना ३३ बॉलमध्ये २८ रनची खेळी केली. पॅट कमिन्सने टाकलेला बाऊन्सरला पंतने हूक करण्याचा प्रयत्न केला. पण हा बॉल पंतच्या बॅटला आणि मग हेल्मेटला लागला. हेल्मेटला लागल्यानंतर बॉल पॉईंटवर उभ्या असलेल्या एश्टन टर्नरच्या हातात गेला. पंतचा हा कॅच टर्नरने सहज पकडला, पण बॉल हेल्मेटला लागल्यामुळे पंतला दुखापत झाली.


'बॅटिंग करत असताना पंतच्या हेल्मेटला बॉल लागला, यानंतर तो फिल्डिंगला आला नाही. त्याच्याऐवजी केएल राहुलने विकेट कीपिंग केली. पंतवर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत,' असं बीसीसीआयने सांगितलं आहे.


बीसीसीआयने ऋषभ पंतच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची अजून निवड केलेली नाही. पण पंत पुढची मॅच खेळणार का नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिल्या मॅचमध्ये राहुलने विकेट कीपिंग केल्यामुळे मनिष पांडे फिल्डिंगला आला होता.