पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत आहे. अशातच भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. भारतीय टीमचा ओपनर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजला मुकणार आहे. पृथ्वी शॉच्याऐवजी मयंक अग्रवालची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना पृथ्वी शॉला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना शॉच्या पावलाला दुखापत झाली. मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी शॉ फिट होईल, अशी अपेक्षा भारतीय टीमनं व्यक्त केली होती. पण भारतीय टीमची ही अपेक्षा फोल ठरली आहे.


हार्दिक पांड्या फिट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे दुखापतीमुळे पृथ्वी शॉ ही सीरिज खेळू शकणार नसला तरी रणजी ट्रॉफीमधून भारतासाठी चांगली बातमी आली आहे. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं बडोद्याकडून खेळताना मुंबईविरुद्ध मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आणि अर्धशतकही केलं. पांड्यानं घेतलेल्या ७ विकेटपैकी ५ विकेट या एका इनिंगमध्येच आल्या होत्या.


मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये हार्दिक पहिले ३ दिवस खेळला, पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी तो मैदानात आला नाही. हार्दिक पांड्या हा बडोद्याच्या पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही कारण तो ऑस्ट्रेलियाला जाईल, असं वक्तव्य बडोद्याचा कर्णधार केदार देवधरनं सांगितलं. केदार देवधरनं हे वक्तव्य केलं असलं तरी बीसीसीआयकडून मात्र हार्दिक पांड्याबद्दल काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


भारतावर पराभवाचं सावट


भारताविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ११२/५ असा झाला आहे. दिवसाअखेर हनुमा विहारी २४ रनवर नाबाद तर ऋषभ पंत ९ रनवर नाबाद खेळत आहेत. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी भारताला अजूनही १७५ रनची आवश्यकता आहे. पण भारताची ही अवस्था बघता ऑस्ट्रेलियाच ही मॅच पाचव्या दिवशी जिंकेल हे जवळपास स्पष्ट आहे.