ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी शानदार विजय झाला आहे. ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पहिली टेस्ट मॅच जिंकली. या उत्कृष्ठ कामगिरीनंतर भारतीय टीमसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. पूर्ण फिट होण्यासाठी पृथ्वी शॉनं धावायला सुरुवात केली आहे. १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या महिन्यामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्धच्या सराव सामन्यामध्ये फिल्डिंग करताना पृथ्वी शॉच्या पावलाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे पृथ्वी शॉला पहिल्या टेस्ट मॅचला मुकावं लागलं होतं. पृथ्वी शॉनं ऍडलेड टेस्टचा शेवटचा दिवस सुरु होण्याआधी मैदानात कवायत केली.


पदार्पणातच शॉचं शतक


वेस्ट इंडिजविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉनं शतक केलं होतं. पदार्पणातल्या या मॅचमध्ये शॉनं १३४ रनची खेळी केली होती. आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये शतक करणारा पृथ्वी शॉ सगळ्यात लहान भारतीय क्रिकेटपटू बनला होता. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध शॉनं ७० आणि ३३ रनची खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये पृथ्वी शॉला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. पदार्पणातल्या या कामगिरीमुळे पृथ्वी शॉकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण सराव सामन्यावेळी बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना शॉच्या पावलाला दुखापत झाली.


मेलबर्नमध्ये शॉ खेळणार?


पृथ्वी शॉनं आता धावायला सुरुवात केली असली तरी तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्येच उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होईल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कामगिरीमुळे पृथ्वी शॉला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता होती. पण दुखापत झाल्यामुळे मुरली विजय आणि केएल राहुल ओपनिंगला आले. राहुलनं या मॅचमध्ये २ आणि ४४ रन केले तर विजयनं ११ आणि १८ रनची खेळी केली.