`खेळपट्टी म्हणून रस्तेच बनवणार असू तर...`; भारतीय गोलंदाजांच्या धुलाईने हर्षा भोगले संतापले
India Vs Australia Rajkot ODI Harsha Bhogle Angry: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला.
India Vs Australia Rajkot ODI Harsha Bhogle Angry: भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये आज खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीवर डेव्हीड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
भारतीय गोलंदाजांची धुलाई
पहिल्या पॉवर प्लेमध्ये म्हणजे 1 ते 10 ओव्हरदरम्यान ऑस्ट्रेलियाने एका गड्याच्या मोबदल्यात 9 च्या सरासरीने 90 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 37 चेंडूंमध्ये 50 चा टप्पा गाठला. भारताला पहिलं यश डेव्हीड वॉर्नरच्या रुपाने 9 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मिळालं. 34 बॉलमध्ये 56 धावा करुन वॉर्नरल बाद झाला. वॉर्नरने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. वॉर्नरनंतर फलंदाजीसाठी आलेल्या स्टीव्ह स्मिथनेही भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली असून त्यानेही अर्धशतक झळकावलं आहे. 28 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 96 धावांवर मिलेच मार्श बाद झाला. 84 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने मार्श 90 च्या घरात पोहोचला पण 96 वर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर प्रसिद्ध कृष्णाकरवी झेलबाद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेली फटकेबाजी पाहून भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन (पूर्वीचं ट्वीटर) संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले हर्षा भोगले?
सामना सुरु असतानाच हर्षा भोगलेंनी आपला संताप व्यक्त करताना खेळपट्टी एखाद्या रस्त्यासारखी असल्याचं म्हणत एक महत्त्वाची मागणी केली आहे. "आपण खेळपट्टी म्हणून रस्तेच बनवणार असू तर किमान बॉण्ड्री लाइन तरी मागे खेचून अधिक दूर ठेवली पाहिजे. त्यातही अशा मैदानांमध्ये बॉण्ड्री लाइन दूरच ठेवली पाहिजे जिथे मैदानं आकाराने मोठी आहेत," असं हर्षा भोगले यांनी ट्वीटरवरुन म्हटलं आहे.
अनेकजण हर्षा भोगलेंच्या मताशी सहमत
अनेकांनी यावर वेगवेगळी मतं व्यक्त केली असतानाच बऱ्याच जणांनी हा नियम दोन्ही संघांसाठी लागू केला पाहिजे असं म्हणत इंदूरमधील सामन्यची हर्षा भोगलेंना आठवण करुन दिली आहे. काहींनी हर्षा भोगलेंचं म्हणणं अगदी बरोबर असल्याचं मत मांडलं आहे. अपूर्व आनंद यांनी, मी सुद्धा हाच विचार करत होतो असं म्हणत, "ही पूर्णपणे फलंदाजीसाठीची खेळपट्टी असतानाच यामध्ये गोलंदाजांसाठी आहेच काय? किमान बॉण्ड्री लाइन दूर खेचून त्यांना एक संधी द्यायला हवी होती," असं मत मांडलं आहे. मात्र असं झालं तर सामने कमी धावांचे होतील असंही एकाने यावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.
इंदूरमध्येही घडलेला असाच प्रकार
इंदूरमधील सामन्यादरम्यानही मैदान फारच लहान असल्याची तक्रार अनेक चाहत्यांनी ट्वीटरवरुन केली होती. तसेच इंदूरमधील खेळपट्टीही अगदी एखाद्या रस्त्याप्रमाणे होती त्यामुळेच सर्व फलंदाजांना एवढ्या धावा करता आल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. इंदूरमध्ये भारताने 399 धावांचा डोंगर उभा केला होता. तर या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 300 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकलेला. तरी दोन्ही संघांनी मिळून जळवपास 700 धावा केल्या होता.