VIDEO: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मुंबईकर रोहितची मराठमोळी प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट टीमनं जोरदार सराव सुरु केला आहे.
गाबा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट टीमनं जोरदार सराव सुरु केला आहे. रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा या दोन खेळाडूंनाच ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. रोहित आणि ईशांत यांचा २००७-०८ हा पहिला दौरा होता. यानंतर २०११-१२ आणि २०१४-१५ साली हे दोन्ही खेळाडू भारतीय टीमसोबत होते. रोहित आणि ईशांत यांचा हा ऑस्ट्रेलियाचा चौथा दौरा आहे. त्यामुळे या दोघांना चांगली कामगिरी करण्याबरोबरच नवोदित खेळाडूंनाही मदत करावी लागणार आहे.
ईशांत शर्माची फक्त टेस्ट सीरिजसाठी निवड झाली आहे. तर रोहित शर्मा मात्र टी-२०, वनडे आणि टेस्ट टीमचा भाग आहे. टेस्ट टीममध्ये रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे. २००७ साली पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा खेळणाऱ्या रोहितनं त्याच्या भविष्याची चुणूक दाखवली होती. सचिनबरोबर महत्त्वाच्या मॅचमध्ये पार्टनरशीप करून त्यानं भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली होती. २००७-०८ च्या ट्रायसीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केलं होतं.
ऑस्ट्रेलियाचे तीन दौरे केल्यानंतर आता चौथा दौरा सुरु होण्याआधी मुंबईकर रोहित शर्मानं मराठीमध्ये या दौऱ्याबद्दल वक्तव्य केलं आहे. मला ऑस्ट्रेयिलात खेळायला आवडतं. जेव्हा जेव्हा मी ऑस्ट्रेलियात आलो तेव्हा मी इकडे खेळणं एन्जॉय केलं. यावेळीही मला क्रिकेट एन्जॉय करायचंय आणि मॅच जिंकायच्या आहेत, असं रोहित म्हणाला. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी विचारलेल्या प्रश्नाला रोहित शर्मानं मराठीमध्ये उत्तर दिलं.
ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण आहे. पण आम्हाला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावं लागेल. आमच्याकडे सर्वोत्तम स्पिनर आणि फास्ट बॉलर आहेत. जे ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना आव्हान देतील, असं रोहित म्हणाला. यावेळी सर्वोत्तम कामगिरी करून आम्हाला जिंकायचं आहे. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. याचा फायदा वर्ल्ड कपमध्ये निश्चित होईल, असं रोहितला वाटतंय. रोहितनं आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये १६ वनडेत ५७.५० च्या सरासरीनं ८०५ रन केले आहेत.
खलील अहमदनं आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही त्याला संधी मिळाली तर तो याचीच पुनरावृत्ती करेल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्मानं दिली. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० मॅचच्या सीरिजपासून भारताचा हा दौरा सुरु होईल. टी-२० सीरिजनंतर भारत ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळेल.