दुसऱ्या टी-२०मध्ये भारतापुढे सीरिज वाचवण्याचं आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी टी-२० शुक्रवारी मेलबर्नमध्ये खेळवण्यात येईल.
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी टी-२० शुक्रवारी मेलबर्नमध्ये खेळवण्यात येईल. बुधवारी झालेली पहिली टी-२० ४ रननी गमावल्यामुळे ३ मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०नं पिछाडीवर आहे. खरंतर या मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियापेक्षा ११ रन जास्त बनवले होते. पण पाऊस पडल्यामुळे आणि डकवर्थ लुईस नियमामुळे भारताला या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टी-२०मध्ये भारतीय टीममध्ये बदल होऊ शकतात. भारतानं लागोपाठ ७ टी-२० सीरिज जिंकल्या आहेत. आता आठवी सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीममध्ये बदल केले जातील असं बोललं जातंय. भारतानं ही मॅच हारली तर त्यांचं लागोपाठ सीरिज जिंकण्याचं हे रेकॉर्ड तुटेल.
भारतीय टीमच्या चिंता
लोकेश राहुलचा खराब फॉर्म बघता भारतीय बॅटिंगमध्ये बदल होऊ शकतात. इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टरमधल्या पहिल्या टी-२०मध्ये नाबाद १०१ रन केल्यानंतर राहुलनं ६ मॅचमध्ये फक्त ३० रन केले आहेत. राहुलवर विश्वास ठेवत टीमनं त्याला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं आणि विराटचा क्रमांक बदलून त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यायला लागलं.
कृणालऐवजी चहलला संधी?
पहिल्या टी-२०मध्ये कृणाल पांड्यानं ४ ओव्हरमध्ये ५५ रन दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी कृणालच्या बॉलिंगवर सिक्सवर सिक्स मारले. त्यामुळे मेलबर्नमध्ये कृणाल पांड्याऐवजी युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. पण पांड्याला बाहेर ठेवलं तर टीममधला एक बॅट्समन कमी होईल. त्यामुळे कोहली हा निर्णय घेईल का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारताची खराब फिल्डिंग
पहिल्या टी-२०मध्ये भारताची फिल्डिंगही खराब झाली. विराट कोहलीनं एरॉन फिंचचा कॅच सोडला. यानंतर कोहलीनंच फिल्डिंग करताना चूक केली. तर खलील अहमदनंही जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर एक कॅच सोडला.
मेलबर्नमध्येही पावसाचं सावट
या आठवड्यात मेलबर्नमध्ये जलद हवा आणि वादळ आहे. त्यामुळे या मॅचवरही पावसाचं सावट आहे.
कशी बघाल मॅच?
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली दुसरी टी-२० शुक्रवारी भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० मिनिटांनी सुरु होईल. या मॅचचं प्रसारण सोनी सिक्सवर इंग्रजीमध्ये आणि सोनी टेन ३वर हिंदीमध्ये पाहता येईल. ही मॅच ऑनलाईन सोनी लिव्हवरही पाहता येऊ शकेल.
भारतीय टीम
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलियाची टीम
एरॉन फिंच(कर्णधार), ऍश्टन ऍगर, जेसन बेहरेनडॉर्फ, ऍलेक्स कारे, नॅथन कुल्टर नाईल, क्रिस लिन, बेन मॅकडरमॅट, ग्लेन मॅक्सवेल, डी आर्सी शॉर्ट, बिली स्टानलेक, मार्कस स्टॉयनिस, एन्ड्र्यू टाय, ऍडम झम्पा