INDvsAUS: तिसऱ्या टेस्टमध्ये विराट या खेळाडूंना संधी देणार?
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट मॅच बुधवारी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होईल.
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट मॅच बुधवारी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होईल. ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं तर दुसरी मॅच ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये विजय मिळवणाऱ्या टीमचा या सीरिजमध्ये पराभव होऊ शकणार नाही. दुसऱ्या टेस्टमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्टसाठी विराट कोहली टीममध्ये बदल करू शकतो. पण टीम निवड करताना विराटला भारतीय टीममध्ये सध्या असलेल्या खेळाडूंच्या दुखापतीचाही विचार करावा लागणार आहे.
भारतीय टीममध्ये असलेल्या आर. अश्विन आणि रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अजूनही संभ्रम आहे. तर रवींद्र जडेजा आता फिट झाल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टसाठी हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवालची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. पण हार्दिक पांड्या फिट असला तरी त्याला मॅच प्रॅक्टिस नसल्याचं भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सांगितलं.
ओपनिंगची समस्या
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये भारताचे ओपनर केएल राहुल आणि मुरली विजय अपयशी ठरले. त्यामुळे मेलबर्नमधल्या टेस्टसाठी विराट पुन्हा एकदा या दोघांना घेऊन मैदानात उतरेल याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मयंक अग्रवालची टीममधली निवड निश्चित मानली जात आहे. राहुल आणि विजय यांच्यापैकी एकाची निवड करायची असेल तर विराट विजयच्या नावाला पसंती देईल. या टेस्टसाठी रोहित शर्मा फिट झाला तर त्याला मयंकबरोबर ओपनिंगलाही पाठवलं जाऊ शकतं.
पुजारा, विराट, रहाणेचं स्थान पक्कं
यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचं टीममधलं स्थान पक्कं आहे. पण या सगळ्यांना त्यांची कामगिरी सुधारावी लागणार आहे. विराट आणि रहाणेनं याआधी २०१४ साली शतकी खेळी केली होती. तर पुजारानं ऍडलेडमधल्या पहिल्या टेस्टमध्ये शतक केलं. सहाव्या क्रमांकावर विकेट कीपर ऋषभ पंतची जागाही निश्चित आहे.
हार्दिक खेळला तर विराटची चिंता मिटणार
विराट कोहलीसमोर सध्या सातव्या क्रमांकावर कोणाला खेळवायचं याची समस्या आहे. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याला खेळवण्यात आलं नाही तर हनुमा विहारीला संधी मिळू शकते. पण हार्दिकला खेळवलं तर विराटला ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर चौथ्या फास्ट बॉलरचा पर्याय मिळतो. तर आठव्या क्रमांकावर अश्विन किंवा जडेजाची वर्णी लागू शकते. ९व्या ते ११व्या क्रमांकावर इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची निवड पक्की आहे.
या खेळाडूंमधून भारतीय टीमची निवड
मयंक अग्रवाल, मुरली विजय(किंवा रोहित शर्मा), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या(किंवा हनुमा विहारी), आर. अश्विन (किंवा रवींद्र जडेजा), ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
तिसऱ्या टेस्टसाठी भारताची संभाव्य टीम
मयंक अग्रवाल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी