ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये ऋषभ पंतच्या नावे नकोसा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेटनं शानदार विजय झाला.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेटनं शानदार विजय झाला. कृणाल पांड्या आणि विराट कोहली भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. कृणाल पांड्यानं ४ ओव्हरमध्ये ३६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ४ बॅट्समनना आऊट केलं. तर कर्णधार विराट कोहलीनं ४१ बॉलमध्ये ६१ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.
भारतानं या मॅचमध्ये विजय मिळवला असला तरी विकेट कीपर ऋषभ पंतच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंत पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. अॅन्ड्र्यू टायच्या बॉलिंगवर विकेट कीपिर अॅलेक्स कारेनं पंतचा कॅच पकडला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलला आऊट होणारा ऋषभ पंत हा पहिलाच भारताचा विकेट कीपर आहे.
ऋषभ पंतसाठी खराब सीरिज
ऋषभ पंत पहिल्यांदाच भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला आहे. बॅट्समन म्हणून पंतसाठी ही टी-२० सीरिज खराब गेली. ऋषभ पंतनं पहिल्या टी-२०मध्ये बेजबाबदार शॉट खेळून आऊट झाला. असा शॉट मारल्यामुळे पंतवर टीकाही झाली. या मॅचमध्ये भारताचा ४ रननं पराभव झाला. ऋषभ पंतनं तसा शॉट खेळला नसता तर त्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असता. पहिल्या टी-२०मध्ये पंतनं २० रन केले होते. दुसरी टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती. तर तिसऱ्या मॅचमध्ये पंत शून्य रनवर आऊट झाला.
ऋषभ पंतची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्द
ऋषभ पंतची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्द अजूनही म्हणावी तशी यशस्वी राहिलेली नाही. आत्तापर्यंत खेळलेल्या १० टी-२० मॅचमध्ये पंतनं १९.६२ची सरासरी आणि ११८.०५ च्या स्ट्राईक रेटनं १५७ रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ५८ रन हा पंतचा सर्वाधिक स्कोअर आहे. ११ नोव्हेंबरला चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-२०मध्ये पंतनं हा स्कोअर केला होता. ऋषभ पंतच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक अर्धशतक आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून ऋषभ पंतनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. टेस्ट क्रिकेटमधली पहिलीच रन पंतनं सिक्स मारून केली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये पंतनं खणखणीत शतक ठोकलं होतं. ५ टेस्ट मॅचमध्ये पंतनं ४३.२५ च्या सरासरीनं ३४६ रन केले आहेत. यामध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. ११४ हा पंतचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे.