मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवशी भारतानं डाव ४४३ रनवर घोषित केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ८/० असा स्कोअर केला आहे. तिसऱ्या दिवशी भारताकडून चेतेश्वर पुजारानं शतक केलं. तर कर्णधार विराट कोहली ८२ रनची खेळी केली. रोहित शर्मा ६३ रनवर नाबाद राहिला. रोहित शर्मा बॅटिंग करत असताना स्लेजिंगचा एक मजेदार किस्सा घडला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेट कीपर टीम पेन यानं रोहित शर्माला उचकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीम पेनचा आवाज कॅमेरामध्ये कैद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा बॅटिंगला आला. रोहित बॅटिंगला आल्यावर टीम पेननं त्याचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. रोहित बॅटिंगला आल्यानंतर टीम पेननं स्लिपमध्ये उभ्या असलेल्या एरॉन फिंचशी बोलायला सुरुवात केली. ''तू आयपीएलमधल्या बऱ्याच टीमसोबत खेळला आहेस, पण मी मुंबईला सपोर्ट करायचा का राजस्थानला याबद्दल नेहमी गोंधळात असतो. आज रोहितनं सिक्स मारली तर मी मुंबईला सपोर्ट करीन'', असं टीम पेन म्हणाला.



स्टम्प मायक्रोफोनमध्ये टीम पेनचं हे बोलणं ऐकू आल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू आवरलं नाही. रोहित शर्मानं मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा सिक्स मारण्याच्या नादात आऊट झाला होता. नॅथन लायनच्या आधीच्या बॉलवर सिक्स मारल्यानंतर रोहितनं पुन्हा एकदा सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये तो फसला आणि विकेट गमावून बसला. त्यामुळे या टेस्टमध्येही टीम पेननं रोहितला उचकवण्याचा प्रयत्न केला.


रोहित शर्मानं तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ६३ रनची खेळी केली. यावेळी रोहितला एक जीवनदानही मिळालं. १४७व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या बॉलिंगवर रोहित शर्मानं स्विप मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल टॉप एजला लागून शॉर्ट फाईन लेगजवळ गेला. या ठिकाणी फिल्डिंगला उभ्या असलेल्या पीटर सीडलनं रोहितचा साधा कॅच सोडला. त्यावेळी रोहित १५ रनवर खेळत होता.