एक शतक ५ रेकॉर्ड, नवीन वर्षातही विराट सुसाट!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय झाला.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकामुळे भारताचा विजय झाला. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३९वं शतक होतं. या कामगिरीमुळे ३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-१नं बरोबरी केली आहे. २९९ रनचा पाठलाग करत असताना कोहलीनं ४२व्या ओव्हरमध्ये पीटर सीडलच्या बॉलिंगवर त्याचं शतक पूर्ण केलं. शिखर धवनची विकेट गेल्यानंतर बॅटिंगला आलेल्या विराटनं १०८ बॉलमध्ये १०४ रनची खेळी केली. कोहलीच्या या खेळीमध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटनं फक्त शतकच केलं नाही, तर रोहित शर्माबरोबर ५४ रनची आणि अंबाती रायुडूबरोबर ५९ रनची पार्टनरशीप केली. रोहित शर्मा ४३ रनवर आणि रायुडू २४ रनवर आऊट झाला, पण कोहली एका बाजूनं किल्ला लढवतच होता. पण मॅच हातात येत असतनाच रिचर्डसनच्या बॉलिंगवर विराट आऊट झाला. यानंतर धोनी आणि कार्तिकनं भारताला जिंकवून दिलं. धोनीनं ५४ बॉलमध्ये ५५ रनची आणि कार्तिकनं १४ बॉलमध्ये २५ रन केले.
दुसऱ्या वनडेमधल्या या शतकाबरोबरच विराट कोहलीनं ५ रेकॉर्ड केले आहेत.
१ विराट कोहलीचं हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं सहावं शतक आणि ऑस्ट्रेलियातलं पाचवं शतक होतं. सचिन तेंडुलकर (९ शतकं) आणि रोहित शर्मा (७ शतकं) या दोन खेळाडूंचीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटपेक्षा जास्त शतकं आहेत.
२ वनडेमध्ये परदेशात सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. परदेशामध्ये विराटच्या नावावर आता २२ शतकं आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि कुमार संगकाराच्या परदेशातल्या २१ शतकांचं रेकॉर्ड विराटनं मोडलं. या यादीमध्ये २९ शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.
३ विराट कोहलीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे ६४वं शतक होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढी शतकं करणारा विराट तिसरा खेळाडू बनला आहे. कुमार संगकाराचं ६३ शतकांचं रेकॉर्ड विराटनं मोडीत काढलं. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या क्रमांकावर आणि रिकी पॉण्टिंग ७१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिननं ७८२ इनिंगमध्ये तर पॉण्टिंगनं ६६८ इनिंगमध्ये एवढी शतकं केली.
४ या मॅचमध्ये विराट कोहली वनडेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ११व्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटनं आत्तापर्यंत वनडेमध्ये १०,३३९ रन केले आहेत. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला विराटनं मागे टाकलं आहे. दिलशाननं ३०३ इनिंगमध्ये १०,२९० कन केले होते. विराटला हे रेकॉर्ड मोडायला फक्त २१० इनिंग लागल्या.
५ २०१७ पासून विराट कोहलीनं वनडेमध्ये सर्वाधिक शतकं केली आहेत. २०१७ पासून विराटची वनडेमध्ये १३ शतकं झाली आहेत. रोहित शर्माच्या १२ शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी आणि निर्णायक वनडे शुक्रवार १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताचा ३४ रननी पराभव झाला होता, तर दुसऱ्या वनडेत भारताचा ६ विकेटनी विजय झाला. तिसरी वनडे जिंकणारी टीम सीरिज खिशात टाकेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली टी-२० सीरिज १-१नं बरोबरीत सुटली. एक टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली. तर टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.