ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानामध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला ७० वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ वर्षातला भारताचा हा तिसरा महत्त्वाचा दौरा आहे. याआधी जानेवारी महिन्यात भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा १-२नं पराभव झाला होता. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतानं इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळली. या सीरिजमध्ये भारताचा १-४नं पराभव झाला. आता भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याप्रमाणेच पहिल्या दोन्ही दोऱ्यांमध्येही भारत सीरिज जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता या २ सीरिजमुळे लागलेला कलंक पुसण्याची संधी विराटच्या टीमकडे आहे.


ऍडलेडच्या मैदानात भारतानं आत्तापर्यंत ११ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या एकाच टेस्ट मॅचमध्ये भारताला विजय मिळाला होता. १५ वर्षांपूर्वी राहुल द्रविडचं द्विशतक आणि अजित आगरकरच्या बॉलिंगमुळे या मैदानात भारत जिंकला होता. ऍडलेडमध्ये भारत ७ मॅच हारला आहे तर ३ मॅच ड्रॉ झाल्या आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत ९४ टेस्ट मॅच झाल्या आहेत. यातल्या ४१ मॅच ऑस्ट्रेलियानं आणि २६ मॅच भारतानं जिंकल्या. भारतानं २६ पैकी ५ टेस्ट मॅच ऑस्ट्रेलियात तर उरलेल्या मॅच मायदेशात जिंकल्या.


मागच्या ७० वर्षांमध्ये भारत ११ वेळा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. यातल्या फक्त २ सीरिज भारताला ड्रॉ करता आल्या. पहिले १९८०-८१ मध्ये सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात आणि २००३-०४ साली गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं सीरिज ड्रॉ केली होती.


भारतीय टीमच्या रणनितीमध्ये बदल


नेहमी आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या विराट कोहलीनं पहिल्या मॅचमध्ये मात्र रणनितीमध्ये बदल केले आहेत. १२ खेळाडूंमध्ये हनुमा विहारी आणि रोहित शर्मा यांची निवड झाल्यामुळे २० विकेट घेण्यासाठी भारत ५ बॉलरऐवजी ४ बॉलर घेऊनच मैदानात उतरेल अशी दाट शक्यता आहे. ऑल राऊंडर हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय टीमचं संतुलन बिघडलं आहे.


पांड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला संधी मिळणार का विहारीला हा प्रश्न विराटपुढे आहे. रोहितनं त्याची शेवटची टेस्ट मॅच दक्षिण आफ्रिकेत खेळली होती. पाचव्या नंबरवर बॅटिंग करत रोहितनं ४ इनिंगमध्ये फक्त ७८ रनच केले होते. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये विहारीला संधी देण्यात आली होती. तेव्हा विहारीनं अर्धशतक केलं होतं.


ऑस्ट्रेलियाची कमजोर टीम


सध्याची ऑस्ट्रेलियाची टीम कमजोर असल्यामुळे भारताच्या सीरिज जिंकण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत. बॉलशी छेडछाड केल्यामुळे निलंबन झालेले ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे ४ टेस्ट मॅचची सीरिज जिंकण्याची चांगली संधी भारताला आहे.


विराटसोडून इतर बॅट्समन अपयशी


दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यामध्ये विराटसोडून इतर बॅट्समन अपयशी ठरले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये कोहलीनं ३ टेस्ट मॅचमध्ये २८६ रन केले. या दौऱ्यात पुजाराला १००, मुरली विजयला १०२ आणि राहुलला २ टेस्टमध्ये ३० रन करता आले. इंग्लंडमध्ये २ टेस्ट मॅचमध्ये २६ रन केल्यानंतर विजयला डच्चू देण्यात आला. राहुलनं ५ टेस्ट मॅचमध्ये २९९ रन केले यातले १४९ रन शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमधले आहेत.


ओपनरचे प्रयोग


भारतानं ८ टेस्ट मॅचमध्ये ४ वेगवेगळ्या ओपनरच्या जोड्या मैदानात उतरवल्या. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजयसोबत पार्थिव पटेल ओपनिंगला आला. पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे आता राहुल आणि विजय ओपनिंगला येतील हे निश्चित मानलं जातंय. फास्ट बॉलरमध्ये ईशांत शर्मा आणि बुमराहचं नाव निश्चित आहे, तर मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. स्पिन बॉलिंगची जबाबदारी अश्विनवर असेल.


भारतीय टीम


विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह


ऑस्ट्रेलियाची टीम


टीम पेन(कर्णधार), जॉस हेजलवूड, मिचेल मार्श, पॅट कमिन्स, एरॉन फिंच, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, मार्कस हॅरिस, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, पीटर सीडल, मिचेल स्टार्क, क्रिस ट्रेमन