मेलबर्न : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचा मैदानातला आक्रमकपणा काही नवा नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्येही त्यानं मैदानात दाखवलेल्या आक्रमकपणाचं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि मिचेल स्टार्क यांनी कौतुक केलं. पर्थ टेस्टदरम्यान टीम पेनसोबत मैदानात झालेल्या वादामुळे विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियातल्या मीडियानं जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियन मीडियानं विराटला खलनायकाच्या भूमिकेत दाखवलं. या सगळ्या वादावर आता विराटनं सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी काय करतो किंवा मी काय विचार करतो, मी असा आहे आणि तुम्ही मला पसंत करा, हे सांगत मी बॅनर घेऊन दुनियाभर फिरणार नाही. या सगळ्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाही. हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आणि वैयक्तिक पसंती आहे. माझं लक्ष टेस्ट मॅच जिंकण्यावर आणि टीमच्या चांगल्या कामगिरीवर असल्याचं विराट म्हणाला. लोकं माझ्याबद्दल काय लिहित आहेत, याची मला माहिती नाही, पण मला त्यांच्या मताचा आदर असल्याचं विराटनं सांगितलं.


लोकं माझ्याबद्दल काय बोलतात याची मला माहिती नाही आणि याचा मला फरकही पडत नाही. प्रत्येकाला स्वत:चं मत मांडायचा अधिकार आहे आणि मी त्याचा सन्मान करतो, असं सडेतोड प्रत्युत्तर विराटनं दिलं.


मैदानात या गोष्टी होतात


पर्थ टेस्टदरम्यान टीम पेनसोबत झालेल्या बाचाबाचीवरही विराटनं प्रतिक्रिया दिली आहे. हे टेस्ट क्रिकेट आहे. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर दोन तगड्या प्रतिस्पर्धी टीम एकमेकांविरुद्ध खेळत असताना या गोष्टी होत असतात. या वादांना तिकडेच सोडून दिलं पाहिजे आणि पुढच्या टेस्टवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं वक्तव्य विराटनं केलं.


जोपर्यंत मर्यादा ओलांडली जात नाही, तोपर्यंत यामध्ये काहीही गैर नाही. नेमकं काय झालं हे मला आणि टीम पेनला नेमकं माहिती आहे. तसंच कोणतीही अनावश्यक गोष्ट मैदानात करायची नाही हे आम्ही दोघं समजतो. आम्हाला दोघांना आमच्या टीमचं चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करायचं आहे आणि चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, जे प्रेक्षकांना बघायचं आहे, असं सांगत विराटनं टीम पेनचीही बाजू घेतली. 


VIDEO: विराट कोहली-टीम पेन मैदानातच भिडले