IND vs BAN: भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 376 धावांवर सर्वबाद झाला असून, फक्त 27 धावांमध्ये शेवटचे चार विकेट्स गमावले. हसन महमूद याने सलग चार विकेट मिळवले. तस्कीन अहमदने तीन विकेट मिळवले. दरम्यान आकाश दीपने बांगलादेश फलंदाजांना सळो की पळो केलं असून 26 धावांत 3 विकेट्स मिळवले आहेत. जर अशाच प्रकारे फलंदाज माघारी परतत राहिले तर कसोटी सामना तीन दिससांत संपू शकतो. त्यात हा सामना भारत जिंकेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सर्व बाबी भारतीय संघाच्या बाजूने दिसत आहे. आकाश आणि जसप्रीत बुमराह यांनी बांगलादेशच्या फलंदाजांसमोर चांगलंच आव्हान उभं केलं आहे. भारताने अद्याप तरी कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. फक्त कर्णधार रोहित शर्माने घेतलेल्या एका डीआरएसचा अपवाद त्यात आहे. बांगलादेशचा आघाडीचा फलंदाज झाकीर हसन फलंदाजी करत असताना रोहित शर्माने हा डीआरएस घेतला होता. 


मोहम्मद सिराज चौथी ओव्हर टाकत असताना चेंडू झाकीर हसनच्या पायावर लागला. सिराजने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली असता अम्पायरने नाबाद दिलं. यावेली मोहम्मद सिराज रिव्ह्यू घेण्यासाठी आग्रह करत होता. मात्र ऋषभ पंतचं मत वेगळं होतं. अखेर रोहित शर्माने मोहम्मद सिराजकडे दुर्लक्ष केलं आणि पंतचं म्हणणं ऐकलं. 



चेंडू हसनच्या पॅडवर लागल्यानंतर रोहित शर्मा, 'वरती आहे? नाही? निघतोय' असं बोलत असल्याचं स्टम्प माईकमध्ये कैद झालं आहे. रोहितने पंतचा सल्ला ऐकला होता. पण रिप्ले दाखवण्यात आलं असता मोहम्मद सिराज योग्य होता हे लक्षात आलं. पण यामुळे भारताचं फार नुकसान झालं नाही. कारण काही वेळात आकाशने हसनला 4 धावांवर तंबूत धाडलं. पण मोहम्मद सिराज ज्या आक्रमकतेने गोलंदाजी करत होता त्याला विकेट घेणाऱ्यांच्या यादीत येण्यास आवडलं असतं. 


रोहितने हात जोडून मागितली सिराजची माफी


मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला असता मोहम्मद सिराज काहीसा चिडलेला दिसला. यानंतर रोहित शर्माने दुरुनच मोहम्मद सिराजला हात दाखवत माफी मागितली. तसंच पंतने आपली चूक झाल्याचं मान्य केलं. पण मोहम्मद सिराज संतापलेला होता. जर रोहितने मोहम्मद सिराजचं ऐकलं असतं तर त्याच्या नावावर आणखी एका विकेटची नोंद झाली असती. 


यादरम्यान समालोचन करणारे रवी शास्त्री यांनीही, सिराजला रिप्ले दाखवू नका, त्याला अजिबात आवडणार नाही असं म्हटलं. "सिराजने जिथून डिलिव्हरी केली आहे ते पाहिल्यास, ते स्टंपच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मला वाटतं की 50-50 टक्के संधी आहे. तो डिलिव्हरीच्या वेळी स्टंपच्या जवळ जातो त्यामुळे लेग बिफोरची शक्यता जास्त असते," असं त्यांनी सांगितलं.