लंडन : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली चुरस आता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन संघात रंगणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात ही लढाई होणार आहे. शेवटच्या लीग मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. या मॅचमध्ये भारतानं अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय टीमकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची भाषा क्रिकेट फॅन्सना आहे. ही मॅच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगसाठीही स्पेशल असणार आहे.


युवीची ही वनडे करियरमधील तीनशेवी मॅच असेल. तर मॅचला विराट सेना कोणत्याही परिस्थितीत कमी लेखणार नाही. कारण लीग मॅचमध्ये मुर्तजाच्या नेतृत्वात खेळणा-या बांगलादेशच्या टीमनं बलाढ्य न्यूझीलंडला धूळ चारली होती. बांगलादेशचे तमिम इक्बाल, शाकिब-ऊल-हसन आणि मोहम्मदउल्ला या बॅट्समन्सनी स्पर्धेत चांगली कामगिरी केलीय. तसंच बांगलादेशच्या बॉलर्सनीही टीम इंडियाच्या बॅट्समन्सना वेळोवेळी संघर्ष करण्यास भाग पाडलंय. त्यामुळे बर्मिंगहॅमची ही सेमीफायनल अटीतटीची होण्याची शक्यता आहे.