पाचव्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल होणार!
इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला. आता शेवटची टेस्ट ७ सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानात होणार आहे. पहिल्या आणि चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ आणि ६० रन एवढ्या कमी फरकानी पराभव झाला. बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे भारताला या मॅच जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे पाचव्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये काही बदल केले जाऊ शकतात. यातलं पहिलं नाव म्हणजे ओपनर लोकेश राहुल. राहुलला मागच्या ४ही टेस्टमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे राहुलऐवजी पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते.
लोकेश राहुलनं पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ४ आणि १३, दुसऱ्या टेस्टमध्ये ८ आणि १०, तिसऱ्या टेस्टमध्ये २३ आणि ३६ आणि चौथ्या टेस्टमध्ये १९ आणि शून्य रनवर आऊट झाला. पृथ्वी शॉनं भारत ए कडून खेळताना दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध १३६ रनची खेळी केली. याआधी इंग्लंड लायन्सविरुद्ध शॉनं ६२ रन केले होते. वेस्ट इंडिज ए विरुद्ध शॉनं १८८ रनची खेळी केली होती. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या शॉला संधी दिली जाऊ शकते.
अश्विनलाही संधी नाही?
चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा ऑफ स्पिनर मोईन अलीनं मॅचमध्ये ९ विकेट घेतल्या. पण भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनला मात्र खेळपट्टी अनुकूल असूनही अशी कामगिरी करता आली नाही. या मॅचआधी अश्विनच्या फिटनेसविषयीही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसंच पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना भारतीय टीम कठीण परिस्थितीमध्ये असताना अश्विन रिव्हर्स स्वीप मारताना आऊट झाला. अश्विनच्या या शॉटवर टीका करण्यात आली होती.
पाचव्या टेस्ट मॅचमध्ये अश्विनला संधी दिली नाही तर त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाची टीममध्ये निवड होऊ शकते. ऑल राऊंडर असलेल्या जडेजाला पहिल्या ४ही टेस्ट मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. जडेजाला संधी मिळाली तर कमजोर वाटणारी भारतीय बॅटिंग आणखी मजबूत होऊ शकते.