India vs England Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रांचीमधील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडिअम कॉम्प्लेक्समध्ये हा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने या सामन्यात वर्चस्व राखलं असून, 7 विकेट्स मिळवले आहेत. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ गडगडला होता. पण नंतर जो रुटने केलेलं शतक आणि भक्कम भागीदारींच्या जोरावर 300 धावांचा टप्पा पार केला. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने 7 गडी गमावत 302 धावा केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या सामन्यातील भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारताने डीआरएस मागितला असता कॅमेरामनचं लक्ष आपल्याकडे असल्याने रोहित शर्मा वैतागला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झाला आहे.


झालं असं की, रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा फलंदाज बेन फोक्स फलंदाजी करत होता. यावेळी रवींद्र जाडेजाने एका चेंडूवर अपील केली असता अम्पायरने नाबाद दिलं होतं. यावर रवींद्र जाडेजाशी चर्चा करुन रोहित शर्माने डीआरएस मागितला. पण थर्ड अम्पायरकडून निर्णय देण्यास उशीर होत होता. यामुळे सर्व खेळाडू अम्पायर का निर्णय देतो याची आतुरतेने वाट पाहत होते. 


सर्व खेळाडू काय निर्णय देतो याची वाट पाहत स्क्रीनकडे पाहत होते. यावेळी कॅमेरामनने रोहितकडे कॅमेरा वळवला. डीआरएसचा निर्णय दाखवण्याऐवजी स्क्रीनवर आपला चेहरा दाखवला जात असल्याने रोहित शर्मा वैतागला. त्याने आपला चेहरा दाखवण्यापेक्षा निर्णय लवकर दाखवा असं इशाऱ्यात सांगितलं. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यााच निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात जलदगती गोलंदाज आकाश दीपला संधी देण्यात आली. त्याने आपली निवड सार्थ ठरवत इंग्लंडच्या आघाडीचा धुव्वा उडवला. 27 वर्षीय आकाश दीपने झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ओली पोप यांना बाद केलं. पहिल्या सेशनमध्ये भारताने 5 विकेट्स मिळवल्या. 


पण जो रुटने आपल्या जबरदस्त शतकासह इंग्लंड संघाला भक्कम स्थितीत आणलं आणि पहिल्या दिवशी सर्वबाद होण्यापासून वाचवलं. पहिल्या दिवशी इंग्लंडने 7 विकेट्स गमावत 302 धावा केल्या. रुट 226 चेंडूत 106 धावांवर नाबाद आहे. 


पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथी कसोटी जिंकत भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे इंग्लंड संघ बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना निर्णायक ठरेल.