रवी शास्त्रींकडून मोठी चूक! सरफराजच्या पत्नीचा आई म्हणून केला उल्लेख
India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सरफराज खानने (Sarfaraz Khan) फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर समालोचन करताना त्याच्या पत्नीचा आई म्हणून उल्लेख केला.
India vs England Test: राजकोटमध्ये इंग्लंडविरोधातील तिसरा कसोटी सामना खेळण्याला सुरुवात करण्याआधी सरफराज खानला अनिल कुंबळेने कॅप दिली तेव्हा तो भारतीय संघाकडून खेळणारा 311 वा खेळाडू ठरला. सरफराजसाठी त्याच्या आयुष्यातील हा महत्ताचा क्षण होता. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्याचे वडील नौशाद खान आणि पत्नी रोमाना हजर होते. मैदानात सरफराजला कॅप मिळाली तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर होत होते. सरफराजनेही मैदानात सहकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर वडील आणि पत्नीच्या दिशेने धाव घेत मिठी मारत आपला आनंद व्यक्त केला होता.
यादरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री चर्चेत आहेत. याचं कारण जेव्हा सरफराज खान खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीचा उल्लेख आई म्हणून केला. रवी शास्त्री यांची क्लिप सोशळ मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यात ते म्हणत आहेत की, 'त्याचे वडील आणि आई खेळताना पाहत आहेत'.
सरफराजने पहिल्याच सामन्यात 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यासह त्याने पहिल्या कसोटी सामन्यात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. सरफराजने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने फक्त 66 चेंडूत 62 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकाच्या जोरावर 86 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावत 326 धावा केल्या होत्या.
रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे बाद
सरफराज जेव्हा मैदानावर आला तेव्हा जडेजाला शतकासाठी 16 धावांची गरज होती. सरफराजने मैदानात येताच आपली क्षमता दाखवत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. रवींद्र जडेजा जेव्हा 99 धावांवर पोहोचला, तेव्हा सरफराजने 60 धावांचा पल्ला गाठला होता. 99 धावांवर असताना जाडेजाने चोरटी धाव घेण्याच्या नादात सरफराज खानला चुकीचा कॉल दिला आणि रन आऊट केलं. अर्धशतक ठोकत चांगली खेळी करणारा सरफराज अशाप्रकारे बाद झाल्याचं पाहून कर्णधार रोहित शर्माचाही संताप झाला होता.
अनिल कुंबळेने व्यक्त केली खंत
रवींद्र जाडेजा आणि सरफराज यांच्यात झालेल्या भागीदारीवर भारताचा महान गोलंदाज अनिल कुंबळेने भाष्य केलं आहे. 90 धावा पूर्ण केल्यानंतर रवींद्र जाडेजा नर्व्हस 90 मध्ये गेला असं त्याने सांगितलं. "हो, सरफराज या भागीदारीत वर्चस्व गाजवत होता. पण मला वाटतं जाडेजा एका मनस्थितीत अडकला होता. त्यामुळे काहीवेळा आपण निर्णय घेण्याबाबत स्पष्ट नसतो. त्यामुळे हे एक कारण असावं आणि कदाचित पहिल्या सामन्यात मी माझं बॅड लक सरफारजला दिलं असावं," असं अनिल कुंबळेने म्हटलं आहे.