Ind vs NZ 2nd T20I | आयपीएलमधील शानदार कामगिरीचं बक्षिस, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी
आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
रांची | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रांचीत दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येत आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने एक मोठा निर्णय घेतला. आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाकेदार गोलंदाजी केलेल्या युवा हर्षल पटेलला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माने टॉसनंतर याबाबतची माहिती दिली. (india vs new zealand 2nd t 20I Bowler harshal patel makes his debut at jharkhand State Cricket Association Stadium under rohit sharma captaincy)
हर्षल पटेलचं पदार्पण
मोहम्मद सिराजला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे सिराजला या दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले. मात्र ही दुखापत हर्षलच्या पथ्यावर पडली. हर्षलला पदार्पणाची संधी मिळाली. हर्षलला खऱ्या अर्थाने त्याने आयपीएलच्या 14 व्या मोसमात केलेल्या कामगिरीचं बक्षिस मिळालं आहे.
हर्षलने आयपीएलच्या 14 व्या मोसमात गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला होता. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये एकूण 32 विकेट्स घेतल्या होत्या. यासह हर्षल आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला होता. हर्षलला सामन्याआधी सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या हस्ते कॅप देण्यात आली. यानंतर हर्षलचं सर्वांनी अभिनंदन केलं.
दरम्यान हर्षल या न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत व्यंकटेश अय्यरनंतर टी 20 पदार्पण करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हर्षलकडून आयपीएलसारख्याच कामगिरीच अपेक्षा असणार आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचे शिलेदार | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, एम चॅम्पमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.