India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला `याला समजवा...`; रोहितही अडून राहिला
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या (Sarfaraz Naushad Khan) कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल (Daryl Joseph Mitchell) फारच वैतागला होता
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या (Sarfaraz Naushad Khan) कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल (Daryl Joseph Mitchell) फारच वैतागला होता. 32 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. सरफराज खान सतत बोलत असल्याने मिशेल वैतागला असता, यानंतर अम्पायर्सनी त्याला बोलावलं. यानंतर रोहितने मध्यस्थी करत आपली बाजू मांडली. काही वेळाने हा वाद मिटला.
फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवत न्यूझीलंडला धक्के दिले. यानंतर लंचपर्यंत न्यूझीलंडची स्थिती 92 धावांवर 3 गडी बाद होती. वेगवान गोलंदाज आकाश दीपने (1/22) भारताला पहिले यश मिळवून दिल्यानंतर वॉशिंग्टनने (2/26) आणखी दोन विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सातत्यपूर्ण दबाव कायम ठेवत मालिकेत त्याच्या विकेटची संख्या 13 वर नेली.
उपाहाराच्या वेळी विल यंगने नाबाद 38 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर दुसऱ्या टोकाला डॅरिल मिशेल (नाबाद 11) खेळपट्टीवर टिकून राहिल्याने संघाच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या होत्या. कर्णधार टॉम लॅथम (28) आणि फॉर्मात असलेल्या रचिन रवींद्र (5) यांना वॉशिंग्टनने तंबूत धाडल्याने भारतीय संघाचं पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं.
पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात 11 विकेट्स मिळवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजी मिळताच लगेच लय पकडली. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार आणि फॉर्मात असणाऱ्या रवींद्र रचिनला सारख्या पद्धतीने बाद केलं.
दरम्यान न्यूझीलंड संघ 235 धावांवर ऑल आऊट झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरने 4 तर रवींद्र जडेजाने 5 विकेट्स घेतले. आकाशदीपने एक विकेट मिळवला. भारतीय संघ फलंदाजीला आला असता लगेचच पहिली विकेट गमावली. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला असून, पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरला.
भारतीय संघाचा तिसरा कसोटी सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याच्या प्रयत्न असेल. जर न्यूझीलंड संघाने सामना जिंकला तर भारतीय संघावर 24 वर्षांनी घऱच्या मैदानावर व्हॉईटवॉश होण्याची नामुष्की ओढवेल.