वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा तब्बल ८० रननी पराभव झाला. रनच्याबाबतीत भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव होता. या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनं भारताकडून सर्वाधिक रन केल्या. ३१ बॉलमध्ये ३९ रन करून धोनी आऊट झाला. धोनीच्या या कामगिरीनंतरही भारताला न्यूझीलंडनं ठेवलेलं २२० रनचं कठीण आव्हान पार करता आलं नाही. धोनीनं या मॅचमध्ये भारताकडून सर्वाधिक रन केल्या असल्या तरी त्यानं नकोसं रेकॉर्ड बनवलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये जेव्हा धोनीनं भारताकडून सर्वाधिक रन केल्या, तेव्हा भारताचा पराभव झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टी-२०मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. न्यूझीलंडनं २० ओव्हरमध्ये तब्बल २१९ रनचा टप्पा गाठला. ओपनर टीम सायफर्टनं ४३ बॉलमध्ये ८४ रनची आक्रमक खेळी केली. सायफर्टला कॉलीन मुन्रो (३४ रन) आणि केन विलियमसन(३४ रन) यांनी चांगली साथ दिली. तर तळाला येऊन स्कॉट कुगेलेजीननं ७ बॉलमध्ये २० रनची फटकेबाजी करून न्यूझीलंडचा स्कोअर २१९ पर्यंत पोहोचवला.


न्यूझीलंडनं ठेवलेल्या २२० रनचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्का लागला. रोहित शर्मा १ रनवर आऊट झाला. यानंतर शिखर धवन(२९ रन) आणि विजय शंकर(२७ रन) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. या दोघांची विकेट गेल्यानंतर भारताची मधली फळी कोसळली. ऋषभ पंत ४ रनवर, दिनेश कार्तिक ५ रनवर आणि हार्दिक पांड्या ४ रनवर आऊट झाला.


झटपट विकेट पडल्यानंतर धोनी आणि कृणाल पांड्याला या आव्हानाचा पाठलाग करणं जवळपास अशक्य झालं. या मॅचमध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १,५०० रनचा टप्पा गाठला. पण सर्वाधिक रन करणाऱ्या धोनीच्या नावावर नकोशा रेकॉर्डचीही नोंद झाली. 


धोनीचा सर्वाधिक स्कोअर, आणि भारताचा पराभव 


४८ नाबाद, ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सिडनी, २०१२ (भारताचा ३१ रननी पराभव)


३८ रन, इंग्लंडविरुद्ध, मुंबई, २०१२ (भारताचा ६ विकेटनं पराभव)


३० रन, न्यूझीलंडविरुद्ध, नागपूर, २०१६ (भारताचा ४७ रननी पराभव)


३६ नाबाद, इंग्लंडविरुद्ध, कानपूर, २०१७ (भारताचा ७ विकेटनी पराभव)


३९ रन, न्यूझीलंडविरुद्ध, वेलिंग्टन, २०१९ (भारताचा ८० रननी पराभव)


भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरी टी-२० शुक्रवारी ऑकलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. टी-२० सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.