हॅमिल्टन : भारतीय टीमने न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. लागोपाठ २ मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागण्याची ही क्रिकेट इतिहासातली पहिलीच वेळ आहे. या २ मॅचनंतर आपण नव्या गोष्टी शिकल्याचं भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मॅचदरम्यान शांत राहून स्वत:वर ताबा ठेवला पाहिजे. काय चाललं आहे ते पाहिलं पाहिजे आणि मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे. लागोपाठ २ मॅच अशापद्धतीने संपल्या. चाहते यापेक्षा जास्तची अपेक्षा करु शकत नाहीत,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


'याआधी आम्ही सुपर ओव्हरमध्ये खेळलो नव्हतो. आता आम्ही लागोपाठ २ सुपर ओव्हरमध्ये खेळलो. मॅच जिंकणार नाही, असं वाटत असताना तुम्ही पुनरागमन करता, हे पाहून चांगलं वाटतं. सुपर ओव्हरमध्ये केएल राहुल आणि संजू सॅमसन ओपनिंगला खेळायला जाणार होते, कारण राहुल आणि संजू मोठे शॉट मारतात. पण अनुभव असल्यामुळे मी मैदानात गेलो. दबावामध्ये इनिंग सांभाळणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं,' असं वक्तव्य विराटने केलं.


'पहिल्या २ बॉलवर मोठे शॉट मिळाल्यानंतर बॉलला गॅपमध्ये खेळवण्याचं मी ठरवलं. मी बराच कालावधी सुपर ओव्हरचा भाग नव्हतो, पण टीमच्या विजयामुळे खुश आहे,' असं विराटने सांगितलं.