India vs New Zealand: प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरची परखड प्रतिक्रिया, म्हणाला `इतकं वाईट...`
Gautam Gambhir on Test Loss: न्यूझीलंडविरोधातील (New Zealand) पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व्यक्त झाला आहे. भारताने 12 वर्षात पहिल्यांदा घऱच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे.
Gautam Gambhir on Test Loss: भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत व्हाईटवॉश केल्यानंतर, भारताला एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला. गेल्या महिन्यात मायदेशात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करून भारत या धक्क्यातून सावरला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारताला 12 वर्षांत पहिल्या कसोटी मालिकेतील पराभव पत्करावा लागला.
बंगळुरूमध्ये पावसाचा फटका बसलेला सलामीचा सामना भारताने 8 विकेटने गमावला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी हैदराबादमध्ये सलामीचा सामना गमावल्यानंतरही संघाने इंग्लंडला 4-1 ने मात दिल्याची आठवण करुन दिली होती. मात्र न्यूझीलंड संघाने पुन्हा एकदा भारतीय संघासह चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला. पुण्यात भारतीय संघाचा 113 धावांनी पराभव झाला. शुक्रवारी मालिकेतील अखेरचा तिसरा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याच्या प्रयत्नात असेल. जर न्यूझीलंड संघाने सामना जिंकला तर भारतीय संघावर 24 वर्षांनी घऱच्या मैदानावर व्हॉईटवॉश होण्याची नामुष्की ओढवेल.
गौतम गंभीरने मालिकेच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या पराभवामुळे फार वेदना झाल्याचं मान्य करताना फक्त फलंदाजांना जबाबदार धरणं टाळलं. जर भारतीय संघाने कानपूरमध्ये दाखवलेल्या बेझबॉलप्रमाणे खेळी करु शकता तर न्यूझीलंड मालिकेसारखे निकाल देखील मिळू शकतात असंही तो म्हणाला.
"प्रत्येकावर जबाबदारी आहे. फक्त फलंदाजांनी आमची निराशा केली असं मी म्हणणार नाही," असं गौतम गंभीरने सांगितलं. पुढे म्हणाला, "हो नक्कीच वेदना होत आहेत. या पराभवानंतर वाईट वाटायला हवं आणि त्यामुळे आम्ही उत्तम होऊ. या स्थितीत येणं यात चूक काय? यामुळे तरुण खेळाडूंना चांगलं क्रिकेटर होण्यासाठी प्रेरणा मिळेल".
"जर आपण कानपूरसारखे निकाल देऊ शकतो, तर असे निकालही येतील आणि पुढे वाटचाल करत राहावं," असं गंभीरने पुढे सांगितलं. भारताच्या माजी सलामीवीराने हेदेखील कबूल केलं की भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याचं काम सोपं नसणार नव्हतं. "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला कधीच सगळं सहज होईल अशी आशा नव्हीत. आम्ही श्रीलंका आणि आता न्यूझीलंडमध्ये हरलो. पण आम्हाला तयारी करत राहण्याची आणि सर्वोत्तम पद्धतीने आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे," असं तो म्हणाला.