न्यूझीलंडच्या टीममध्ये `हा` पंजाबी बॉलर आल्याने टीम इंडियाची चिंता वाढली
ऑस्ट्रेलियाला वन-डे सीरिजमध्ये ४-१ने नमवल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडचा पराभव करण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाला वन-डे सीरिजमध्ये ४-१ने नमवल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडचा पराभव करण्याच्या तयारीत आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबरपासून तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. मात्र, या सीरिजपूर्वी टीम इंडियासाठी एक चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे.
होय, कारण न्यूझीलंडच्या टीमचा टॉड एस्टल हा प्रॅक्टीस दरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आता त्याच्याजागी भारतीय वंशाचा स्पिनर ईश सोढी न्यूझीलंडच्या टीमकडून खेळणार आहे.
ईश सोढी याचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. त्याचं संपूर्ण नाव इंदरबीर सिंह सोढी असं आहे. तो सध्या न्यूझीलंडच्या टीमसाठी खेळतो. भारतीय पिचवर स्पीनर कधीही आपली कामगिरी दाखवू शकतात. त्यामुळे आता ईश सोढी भारतीय बॅट्समनची चिंता वाढवू शकतो.
न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, एस्टल गंभीर जखमी झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. जखमी झाल्याने तो तीन आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाहीये. त्यामुळे आता एस्टल ऐवजी ईश सोढी याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
२४ वर्षीय ईश हा लेग स्पिनर असून त्याने आतापर्यंत टीम इंडियाविरोधात ३ वन-डे मॅचेस खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने चार विकेट्स घेतले. २०१६मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सोढीने जबरदस्त कामगिरी केली होती. भारतात खेळलेल्या या टूर्नामेंटमध्ये त्याने ५ मॅचेसमध्ये १० विकेट्स घेतले होते.