`अनेकदा शांत राहून....`, बंगळुरुमधील पराभवानंतर ऋषभ पंतची भुवया उंचावणारी पोस्ट; `देवच काय ते...`
Rishabh Pant Post: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक थोडक्यात हुकलं. सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर (Social Media) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.
Rishabh Pant Post: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) जखमी झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली. ऋषभ पंत बाहेर गेल्यानंतर ध्रुव जुरेलकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत मैदानात परतला आणि तडाकेबंद फलंदाजी केली. पण दुर्दैवाने त्याचं शतक थोडक्यात हुकलं. ऋषभ पंत 99 धावांवर बाद झाला.
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर (Social Media) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवरील स्टोरीमध्ये त्याने लिहिलं आहे की, 'अनेकदा शांत राहणं उत्तम असतं आणि देवालाच लोकांना काय ते दाखवू दे'.
दरम्यान पंतने पहिल्या सामन्यानंतर एक्सवर पोस्ट शेअऱ करत पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार मानले. उर्वरित मालिकेत भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. "हा खेळ तुमच्या मर्यादांची चाचणी घेतो. तुम्हाला खाली पाडतो. उचलतो आणि पुन्हा एकदा खेळात फेकतो. पण ज्यांचं खेळावर प्रेम आहे, ते नेहमीच दरवेळी जास्त मजबुतीने उभे राहतात. तुम्ही दिलेलं प्रेम, पाठिंबा आणि चिअरसाठी बंगळुरुच्या अप्रतिम प्रेक्षकांचे आभार. आम्ही अजून मजबुतीने पुनरागमन करु," असं पंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
107 धावांचा पाठलाग करताना विल यंग (नाबाद 48) आणि रचिन रवींद्र (नाबाद 39) यांनी 75 धावांची सामना जिंकणारी भागीदारी रचल्यामुळे न्यूझीलंडने कसोटी आठ विकेट्स राखून जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 134 आणि 39* धावा केल्याबद्दल रचिनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा न्यूझीलंडचा 1988 नंतर भारतातील पहिला कसोटी विजय होता. यानिमित्ताने 36 वर्षांनी त्यांनी कसोटी सामना जिंकला. भारतीय भूमीवर 37 कसोटी सामन्यांमधील त्यांचा हा फक्त तिसरा विजय होता. भारताच्या चौथ्या डावात 100 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा न्यूझीलंड हा 2000 नंतर पहिला पाहुणा संघ ठरला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळली जाणार आहे. मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवली जाईल.