India vs New Zealand Third Test: भारतीय संघाचे फलंदाज तिसऱ्या कसोटीतही सपशेल अपयशी ठरले आहेत. कसोटी सामना जिंकण्यासाठी फक्त 147 धावांची गरज असताना पुन्हा एकदा भारताचे आघाडीचे सर्व फलंदाज ढेपाळले असून, स्वस्तात बाद झाले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असून, फक्त 11 धावांवर बाद झाला. रोहित शर्मानंतर पहिल्या डावात 90 धावा करणारा शुभमन गिल बाद झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. शुभमन गिलला एजाज पटेलने टाकलेल्या चेंडूचा अंदाज लावता आला नाही आणि आपली विकेट गमावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंडू वळणार असल्याचा अंदाज असतानाही शुभमन गिलने तो न खेळण्याचा निर्णय घेत सोडून दिला. पण हा चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि शभुमन गिलचा त्रिफळा उडाला. शुभमन गिलच्या विकेटनंतर भारतीय फलंदाजांच्या भक्कम भिंतीला तडे जाऊ लागले. शुभमन गिल फक्त 1 धाव करुन माघारी परतला. पहिल्या डावात फार दबाव असतानाही शुभमन गिलने 90 धावा केल्याने त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. त्याच्या खेळीमुळे भारताने 28 धावांची आघाडी मिळवली होती. 


शुभमन गिल फलंदाजी करत असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर समालोचन करत होते. शुभमन गिलने चेंडू सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर ते प्रचंड संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी आपला संताप बोलूनही दाखवला. "आपण किती वेळा शुभमन गिल चेंडू सोडल्याने बाद झाल्याचं पाहिलं आहे. फिरकी गोलंदाज, जलदगती गोलंदाज...कोणता चेंडू सोडायचा याचा अंदाज हवा. कोणता चेंडू खेळायचा यावर त्याने काम करण्याची गरज आहे," असं सुनील गावसकर म्हणाले.



शुभमन गिलच्या विकेटनंतर पुढे घसरणच सुरु झाली. विराट कोहलीदेखील एक ओव्हरनंतर बाद झाला. टी-20 मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. टी-20 मधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये अजिबात लय सापडत नाही आहे. विराट कोहली 7 चेंडूत 1 धाव करुन बाद झाला. यानंतर यशस्वी जैसवाल 5 आणि सरफराज खान 1 धावावर बाद झाला. 


भारतीय फलंदाजांना सूर गवसेना


न्यूझीलंडविरोधातील मालिकेत भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यातरी फलंदाजांची अपयशी कामगिरी कायम आहे. जिंकण्यासाठी फक्त 147 धावांची गरज असतानाही भारतीय फलंदाज अडखळताना दिसत आहेत. जर भारताने हा सामनाही गमावला तर न्यूझीलंड संघ व्हाईटवॉश देत इतिहास रचेल. न्यूझीलंड संघाने याआधी भारतातही एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. पण यावेळी त्यांना थेट मालिका जिंकण्याची संधी आहे.