नेपियर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचला आहे. या दौऱ्यात भारत ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.  उद्या २३ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. नेपियरमध्ये पहिला एकदिवसीय सामना होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. गेल्या अनेक सामन्यांपासून चमकदार कामगिरी करत असलेल्या कर्णधार विराट कोहलकडून क्रिकेट चाहत्यांना अनेक आशा असणार आहेत. कोहली सध्या आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर आहे.


आपल्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज का समजलं जातं हे सिद्ध करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर असणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळू शकते. तसेच या मालिकेदरम्यान या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.


न्यूझीलंड दौरा हा आगामी वर्ल्ड कपच्यादृष्टीने महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. पहिला सामना हा नेपिअर येथे होणार आहे. नेपिअरची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. याचाच प्रत्यय गेल्या आठवड्यात येथे झालेल्या टी-२० सामन्या दरम्यान आला. या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या टॉम लैथम याने ६ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ११० धावांची तडाखेबाज खेळी केली.


रॉस टेलरची कामगिरी


गेल्या वर्षी रॉस टेलरने १३ डावांमध्ये ९२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेट मध्ये २० शतक लगावणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.


भारताच्या दौऱ्याआधी श्रीलंकेसोबत झालेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रॉस टेलरने अनुक्रमे ५४, ९० आणि १३७ धावांची दमदार खेळी केली होती.  या मालिकेत न्यूझीलंडने श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवला होता. 


कोहलीची कामगिरी


विराट कोहलीनंही मागच्या वर्षी चमकदार कामगिरी केली आहे. कोहलीने गेल्या वर्षभरात १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३३ च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतकांचा समावेश आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीने अनुक्रमे ३, १०४, आणि ४६ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर ३९ शतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४९ शतकांसह सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.