T20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तानची टक्कर! जाणून घ्या आकडेवारीत कोणाचं पारडं आहे जड
IND vs PAK, Women`s T20 World Cup 2024: पहिला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यावर आज भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय टीमला न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आज, 6 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ अ गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
भारतीय टीमचा रेकॉर्ड
भारतीय महिला संघाचा पाकिस्तान टीमविरुद्ध उत्तम रेकॉर्ड आहे. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या 15 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी भारताने 12 सामने जिंकले आहेत. या दोन्ही टीममधील शेवटचा सामना 2024 च्या महिला आशिया कपमध्ये खेळला गेला होता. त्या सामन्यातही भारतीय संघाने सात विकेट्स राखून विजय मिळवला होता.
उत्तम रेकॉर्ड असूनही...
बेस्ट रेकॉर्ड असूनही, भारत आपल्या प्रतिस्पर्ध्याला हलके घेण्याची चूक करू शकत नाही. कारण पाकिस्तानकडे अनुभवी निदा दार, कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बाल यासारखे चांगले गोलंदाज आहेत. याशिवाय भारतीय संघाची सुरुवात पराभवाने झाली आहे, तर पाकिस्तानने मात्र दमदार सुरुवात केली आहे. त्या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने अष्टपैलू कामगिरी केली होती. फातिमाने अवघ्या 10 धावांत 2 बळी घेतले आणि फलंदाजीत 30 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कसे असतील दोन्ही संघ?
भारतीय टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह, दयालन हेमलता, आशा सोभना, राधा यादव, श्रेयंका पाटिल, सजना सजीवन.
पाकिस्तानी टीम: फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाज, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा संधू, निदा डार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन.
पुन्हा रुळावर येण्यासाठी...
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे दुखावलेल्या भारतीय संघाला पुन्हा गाडी रुळावर आणण्यासाठी आधीच्या चुका टाळाव्या लागतील. न्यूझीलंडविरुद्ध, भारताने अरुंधती रेड्डीच्या रूपाने अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश केला होता, त्यामुळे आता टीमला फलंदाजीच्या क्रमात बदल करावे लागले. भारताचा नेट रनरेट चांगला नाही.