पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्टला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधली भारताची ही चौथी तर दक्षिण आफ्रिकेची दुसरी टेस्ट आहे. ९ टीमच्या या चॅम्पियनशीपमध्ये भारताने आपल्या तिन्ही मॅच जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला त्यांचं खातंही उघडता आलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ९ देशांचा समावेश आहे. यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज यांच्या मॅचना सुरुवात झाली आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशने अजून एकही मॅच खेळलेली नाही.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने सर्वाधिक मॅच खेळल्या आहेत. या दोन्ही टीमनी प्रत्येकी ५ तर भारताने ३ मॅच खेळल्या आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी २-२ मॅच तर दक्षिण आफ्रिकेची १ मॅच झाली आहे.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक मॅच खेळल्या असल्या तरी पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारताचे १६० पॉईंट्स आहेत. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी ६०-६० पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने प्रत्येकी ५६-५६ पॉईंट्स कमावले आहेत.


भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ३ टेस्ट मॅचची सीरिज सुरु आहे. या सीरिजमधल्या प्रत्येक मॅचच्या विजयासाठी ४० पॉईंट्स मिळणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला तर २०० पॉईंट्स कमावणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरेल. भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये १२० पॉईंट्स मिळाले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताला ४० पॉईंट्स मिळाले.


भारताचा जर दुसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाला किंवा मॅच ड्रॉ झाली तरी भारत याच सीरिजमध्ये २०० पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी भारताला तिसरी टेस्ट जिंकावी लागेल.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला तरी २०० पॉईंट्स मिळवणारी पहिली टीम ठरण्याचा मान टीम इंडियाला मिळू शकतो. यासाठी नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियाला बांगलादेशला हरवावं लागेल. भारत आणि बांगलादेशमध्ये २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.