तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचेही आफ्रिकेला धक्के
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्के दिले आहेत.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्के दिले आहेत. चहापानापर्यंत १४३ रन्सवर दक्षिण आफ्रिकेचे ६ बॅट्समन आऊट झाले आहेत. हाशीम आमला अर्धशतक करून नाबाद आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं ३, जसप्रीत बुमराहनं २ आणि इशांत शर्मानं एक विकेट घेतली आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेनं ६/१ अशी केली होती. पण दिवसाच्या सुरुवातीलाच आफ्रिकेला डीन एल्गारच्या रुपात एक धक्का बसला. यानंतर काल नाईट वॉचमन म्हणून आलेला कागिसो रबाडा आणि हाशीम आमलानं आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रबाडा ३० रन्सवर आऊट झाला. यानंतर एबी डिव्हिलियर्स, फॅप डुप्लेसिस आणि क्विंटन डिकॉक या तीन विकेट घेऊन भारतानं पुन्हा मॅचमध्ये कमबॅक केलं.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा
तत्पूर्वी पहिल्या दिवशी भारताची पहिली इनिंग १८७ रन्सवर ऑल आऊट झाली. टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेला के.एल.राहुल शून्य रन्सवर आणि मुरली विजय ८ रन्सवर आऊट झाला.
पहिल्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर पुजारा आणि कोहलीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पुजारा आणि कोहलीनं अर्धशतक केलं पण मोठा स्कोअर करण्यात दोघांनाही अपयश आलं. पण या सगळ्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावावर एक लाजिरवाणं रेकॉर्ड झालं आहे. ५३ बॉल्स खेळल्यावर चेतेश्वर पुजाराला पहिली रन काढता आली. या दोघांची विकेट पडल्यावर मात्र भारताची बॅटिंग गडगडली.