Virat Kohli 73rd Century : भारत आणि श्रीलंकेदरम्यान (IND vs SL 1st ODI) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 67 धावांनी पराभूत करुन मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आसाममधील बारसापरा मैदानावर मंगळवारी झालेल्या या सामन्यामध्ये विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील 73 वं शतकं झळकावलं. विराटने 87 चेंडूंमध्ये 113 धावांची तुफान खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. 129.89 च्या सरासरीने विराटने धावा केल्या. या शतकासहीत विराटने सचिन तेंडुलकरचा एक अनोख्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनच्या विक्रमाची विराटने बरोबरी केल्याची सोशल मीडियावर चर्चा असतानाच विराटच्या या विक्रमी शतकावर सचिननेही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Virat Kohli scores hundred matches Sachin Tendulkar record master blaster reacts)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी तुफान फटकेबाजी करत डावाला शानदार सुरुवात केली. पहिल्या 19 षटकांमध्येच भारताचा धावफलक 130 च्या पुढे होता. मात्र 20 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 60 चेंडूमध्ये 70 धावा करुन शुभमन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराटनेही जम बसवला तो 49 व्या षटकापर्यंत. 47 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटने शतकाला गवसणी घातली. 80 चेंडूंमध्ये शतक साजरं केल्यानंतर विराटने 100 वी धाव काढतानाच उंच उडी मारुन सेलिब्रेशन केलं. 73 वं शतकं झळकावल्यानंतर विराटने हेल्मेट काढून आकाशाकडे पाहत बॅट आणि हेल्मेट उंचावत आनंद साजरा केला.


कोहलीने या शतकासहीत सचिनच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. कालच्या सामन्यापूर्वी कोहलीची मायदेशात 19 एकदिवसीय शतकं होती. तर मायदेशात सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर 20 शतकांसहीत अव्वल स्थानी होता. मात्र विराटने काल शतक झळकावल्यानंतर आणि त्यातही कमी सामन्यांमध्ये 20 शतकं झळकावल्याने तो सचिनपेक्षाही सरस ठरला आहे. 


हेसुद्धा वाचा >> IND vs SL Virat Kohli Century: विराट कोहलीच्या ७३ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास Insta स्टोरी


विराटच्या या विक्रमशी शतकानंतर त्याचं सचिनने कौतुक केलं आहे. हवेत उडी मारुन शतक साजरं करतानाच विराटचा फोटो सचिनने शेअर केला आहे. "अशाचप्रकारे विराट कामगिरी करत राहा, भारताचं नावं चमकवत राहा," अशी कॅप्शनसहीत सचिनने हा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने शुभमन गील आणि रोहित शर्माचाही एक फोटो शेअर केला असून या दोघांच्या फलंदाजीचंही त्याने कौतुक केलं आहे. "सलामीवीरांनी भन्नाट कामगिरी केली," असं सचिन म्हणाला आहे.



मागील 20 सामन्यामधील हे विराटचं तिसरं आंतरराष्ट्रीय शतक आहे. त्यामुळे यंदा विश्वचषक स्पर्धा असल्याने वर्षाच्या सुरुवातीलाच विराटला सूर गवसल्याने चाहत्यांना आगामी काळात त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.