IND vs SL Virat Kohli Century: विराट कोहलीच्या ७३ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास Insta स्टोरी

विराटने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाची गोड सुरुवात करुन दिल्यानंतर त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Updated: Jan 10, 2023, 06:13 PM IST
IND vs SL Virat Kohli Century: विराट कोहलीच्या ७३ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास Insta स्टोरी
IND vs SL Virat Kohli hits century wife Anushka Instagram story (Photo- Social Media)

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील पहिल्या सामन्यामध्येच भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावलं. या शतकाबरोबरच विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराटने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाची गोड सुरुवात करुन दिल्यानंतर त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी तुफान फटकेबाजी करत डावाला शानदार सुरुवात केली. पहिल्या १९ षटकांमध्येच भारताचा धावफलक १३० च्या पुढे होता. मात्र २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ६० चेंडूमध्ये ७० धावा करुन शुभमन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराटनेही जम बसवला तो ४९ व्या षटकापर्यंत. विराटने ८७ चेंडूंमध्ये ११३ धावांची तुफान खेळी केली. यामध्ये त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. १२९.८९ च्या सरासरीने विराटने धावा केल्या.

४७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटने शतकाला गवसणी घातली. ८० चेंडूंमध्ये शतक साजरं केल्यानंतर विराटने हेल्मेट काढून आकाशाकडे पाहत बॅट आणि हेल्मेट उंचावत सेलिब्रेशन केलं. विराटच्या याच सेलिब्रेशनचा फोटो अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला आहे. पतीने शतक साजरं करताच अनुष्काने हा फोटो पोस्ट केला. अनुष्का घरी टीव्हीवरच सामन्याचा आनंद घेत असून टीव्हीवर लाइव्ह टेलिकास्टदरम्यान दाखवण्यात आलेला विराटच्या सेलिब्रेशनचा हा फोटो तिने हार्टच्या इमोजीसहीत शेअर केला आहे.

आजच्या सामन्यातील विराटचं शतक हे त्याचं एकदिवसीय सामन्यांमधील ४५ वं तर एकंदरित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३ वं शतक ठरलं.