भारत वि श्रीलंका : पहिल्या दिवशी भारत ६ बाद ३२९
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ६ बाद ३२९ धावा केल्यात.
कँडी : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ६ बाद ३२९ धावा केल्यात.
सलामीवीर शिखर धवनचे ११९ धावांचे शानदार शतक आणि लोकेश राहुलच्या ८५ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर तीनशेपार धावसंख्या उभारली.
धवनने १२३ चेंडूत ११९ धावा तडकावल्या. यात त्याने १७ चौकार ठोकले. तर लोकेश राहुलने १३५ चेंडूत ८५ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने ४२ धावांची खेळी केली. धवन, राहुल आणि कोहलीव्यतिरिक्त भारताचे इतर फलंदाज झटपट बाद झाले.
चेतेश्वर पुजारा ८ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेला १७ धावा करता आल्या. आर. अश्विनने ३१ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा वृद्धिमन साहा १३ आणि हार्दिक पंड्या १ धावेवर खेळत होते.