मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधली पहिली वनडे थोड्याच वेळात सुरु होणार आहे. याआधी टी-२० सीरिजमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा ३-०ने पराभव केला, यानंतर आता वनडेमध्येही अशीच कामगिरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण या सीरिजमध्येही चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबत उत्सुकता कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या चार ते पाच वर्षांपासून चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन टीम इंडियासाठी समस्या राहिली आहे. २०१५ वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळला. यानंतर टीमने चौथ्या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली, पण त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने १० मॅच खेळल्या यामध्ये चौथ्या क्रमांकावर ४ बॅट्समनना संधी देण्यात आली.


इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने सुरुवातीला केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवलं. पण शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे राहुलला ओपनिंगला खेळावं लागलं. राहुलच्याऐवजी विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळला. पण विजय शंकरही अपयशी ठरला. वर्ल्ड कपच्या दोन मॅचमध्ये हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर आला, तर उरलेल्या ४ मॅचमध्ये ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये चौथ्या क्रमांकासाठी ४ पर्याय आहेत. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांचा समावेश आहे.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली. विराट आणि रोहितनेही पंतचं कौतुक केलं. तर वर्ल्ड कपमध्ये धवनला दुखापत होण्याआधी केएल राहुल टीमची चौथ्या क्रमांकासाठीची पसंत होती.


श्रेयस अय्यरला टीम इंडियाचा भविष्यातला मोठा खेळाडू मानलं जात आहे. एक-दोन रन काढण्याबरोबरच अय्यर मोठे शॉटही खेळू शकतो. तर मनिष पांडे याआधी चौथ्या क्रमांकावर खेळला. या क्रमांकावर मनिष पांडेने शतकही केलं होतं. त्यामुळे चौथा क्रमांक हा पुन्हा एकदा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो.


भारतीय टीम


विराट कोहली, (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी