मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टी-२० सीरिज खेळू न शकलेला शिखर धवन वनडे सीरिजही खेळू शकणार नाही. शिखर धवनऐवजी आता वनडे सीरिजमध्ये मयंक अग्रवालची निवड झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या मॅचमध्ये धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. धवनच्या गुडघ्याला टाके पडले होते, हे टाके आता काढण्यात आले असले तरी त्याला दुखापतीतून सावरायला वेळ लागणार आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.


मयंक अग्रवाल हा टेस्ट क्रिकेट आणि स्थानिक स्पर्धांमध्ये खोऱ्याने रन काढत आहे. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मयंकने २ द्विशतकं आणि १ शतक केलं होतं. तसंच विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्नाटककडून खेळताना मयंकने ६९ रनची खेळी केली. या खेळीमुळे तामीळनाडूविरुद्ध कर्नाटकला विजय हजारे ट्रॉफी पटकावता आली. देवधर ट्रॉफीमध्येही भारत सीकडून खेळताना भारत ए विरुद्ध मयंकने शतक केलं होतं.


वर्ल्ड कप २०१९मध्येही विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे मयंक अग्रवालला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली होती, पण वर्ल्ड कपच्या एकाही मॅचमध्ये मयंकला खेळवण्यात आलं नाही. २८ वर्षांच्या मयंक अग्रवालने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ५०.९०च्या सरासरीने १३ शतकं आणि १५ अर्धशतकं केली आहेत.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईमध्ये या सीरिजची पहिली मॅच होईल. यानंतर १८ डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये आणि २२ डिसेंबरला कटकमध्ये मॅच होतील.


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार