India vs WI : भारतीय क्रिकेट (Team India) संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 जुलैपासून डॉमिनिका (dominica test) येथे खेळला गेला. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने अगदी सहज हा सामना जिंकला आहे. पहिला कसोटी सामना 141 धावांनी आणि एका डावाने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आहे. सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो विंडीजच्या बीचवर फोनवर बोलताना दिसत आहे. यासोबत त्याने एक कॅप्शन देखील लिहीले आहे. या फोटोमध्ये रोहितने टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातल्या आहेत. त्याच्या हातात फोन असून तो कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असल्याचे दिसत आहे. मात्र या पोस्टवर त्याची पत्नी रितिका सजदेहने मजेशीर उत्तर देत रोहित शर्माला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.


शनिवारी रोहित शर्माने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. रोहितने कॅप्शनमध्ये 'बाजीगर' चित्रपटाचा एक डायलॉग दिला आहे.  "अनारकली का फोन था. आईसक्रीम खाना बहुत जरूरी है," असे रोहितने लिहिलं आहे. रोहितने हे कॅप्शन बाजीगर या चित्रपटातून घेतले आहे ज्यात जॉनी लीव्हर हे हा प्रसिद्ध डायलॉग बोलले होते. या चित्रपटात जॉनी लीव्हर यांनी सतत विसरणाऱ्या नोकराची भूमिका केली होती.


 



दुसरीकडे रोहितच्या या पोस्टवर पत्नी रितिका हिने मजेशीर कमेंट करत त्यालाचा ट्रोल केले आहे. "पण तू माझ्याशी बोलत होतास आणि कॉफी मशीन ठीक आहे का ते विचारत होतास," असे रितिकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे. रितिकाने एकप्रकारे रोहितची पोलखोल केली आहे.



वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले आहे. डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने 221 चेंडूत 103 धावा केल्या रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे दहावे शतक ठरले. 2013 मध्ये त्याने विंडीजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रोहितने पदार्पणाच्या कसोटीतही शतक झळकावले होते.


रोहित शर्माने यशस्वी जैस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळल्यानंतर, रोहित आणि यशस्वी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 421/5 धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. याला प्रत्युत्तर देताना यजमान संघाला दुसऱ्या डावात केवळ 130 धावा करता आल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.