कोलकाता : क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाच्या कर्णधार विराट कोहली याने असंख्य क्रीडारसिकांवर प्रभाव पाडण्याचं काम केलं आहे. असं असवं तरीही माजी क्रिकेटपटू आणि संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी एकेकाळी सांभाळणाऱ्या सुनील गावस्कर यांना मात्र त्याची भूमिका फारशी न रुचल्याचं स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुलीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील आव्हानांना तोंड देण्यास खरी सुरुवात केली होती, अशा आशयाचं वक्तव्य विराटने करत संघाच्या वाट्याला येणाऱ्या यशाकडे लक्ष वेधत त्याची सुरुवातही तिथूनच झाल्याचा सूर आळवला. त्याच्या याच वक्तव्यावर गावस्कर यांनी शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 


संघाला अतिशय सुरेख विजय मिळाला, पण मला एक मुद्दा मांडायचा आहे असं म्हणज गावस्कर यांनी त्यांचा मुद्दा समोर ठेवला. 'भारतीय कर्मधाराच्या म्हणण्यानुसार हे सारंकाही २००० मध्ये म्हणजेच सौरवच्या संघापासून सुरु झालं. मला ठाऊक आहे की, तो बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आहे, तेव्हा कोहली त्याच्याविषयी चांगलंच बोलेल. पण, भारतीय संघ ७० आणि ८०च्या दशकातही जिंकत होताच..... तेव्हा तो जन्मलाही नव्हता', असं म्हणत गावस्कर यांनी आपला मुद्दा मांडला. 


अनेकांना खरं क्रिकेट हे २००० या वर्षापासून सुरु झालं असंच वाटत असल्याचा समज व्यक्त करत त्यापूर्वी म्हणजेच ७०च्या दशकातही भारत परदेशी दौऱ्यांमध्ये विजय मिळवल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. भारतीय संघाने १९८६मध्येही परदेशी दौऱ्यात विजय मिळवला, शिवाय काही सामने अनिर्णितही काढले, इतर संघांप्रमाणे त्यांचा पराभवही झाला ही बाबही त्यांनी न विसरता मांडली. 


काय म्हणाला होता विराट? 


भारत विरुद्ध बांलगलादेश या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने बांगलादेशचा २-० अशा फरकाने पराभव केला. त्याचवेळी कोलकात्यातील इडन गार्ड्नस येथे विराटच्या वक्तव्याने या मुद्द्याला वाचा फोडली. 



'याची सुरुवात दादाच्या  (सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील) नेतृत्वातील संघापासून झाली होती. आम्ही फक्त ही मालिका पुढे नेत आहोत', असं विराट म्हणाला होता. संघातील गोलंदाजांती फळी ही अतिशय मजबूत असून कोणत्याही फलंदाजाविरुद्ध खेळण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात आल्याचं म्हणज हे गेल्या ३-४ वर्षांतील मेहनतीचं फळ आहे, असं विराट म्हणाला होता.