लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये दोन्ही टीम मैदानात संघर्ष करणार हे निश्चित आहे. पण विजय कोणाचा होणार हे सांगणं मात्र कठीण आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनं मात्र या सीरिजच्या निकालावर भविष्य वर्तवलं आहे. ५ टेस्ट मॅचची ही सीरिज भारत २-१नं जिंकेल असं भाकीत द्रविडनं केलं आहे. याचबरोबर भारतीय टीमनं फास्ट बॉलरच्या फिटनेसकडे लक्ष द्यावं, असा सल्लाही द्रविडनं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सीरिज जिंकायची भारतीय टीमला चांगली संधी आहे. पण भारतीय बॉलरनी २० विकेट घेणं महत्त्वाचं आहे. भारताचे बॅट्समन रन करतील पण बॉलरची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ६ आठवड्यांमध्ये भारताला ५ टेस्ट मॅच खेळायच्या आहेत, त्यामुळे भारतीय बॉलरचा फिटनेस तितकाच महत्त्वाचा आहे.


१९७१, १९८६ आणि २००७ मध्ये भारतानं इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. यातल्या २००७ सालच्या सीरिजमध्ये राहुल द्रविड भारताचा कर्णधार होता. २००७ सालची सीरिज भारत १-०नं जिंकला होता. ट्रेन्ट ब्रिजमधल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता. भारताचा फास्ट बॉलर जहीर खान भारताच्या विजयाचा शिल्पकार होता.