पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा सगळ्यात मोठा विजय झाला आहे. पुण्यात झालेली ही टेस्ट मॅच भारताने इनिंग आणि १३७ रननी जिंकली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फॉलो-ऑन मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या इनिंगमध्ये १८९ रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जडेजाने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या, तर अश्विनला २ आणि इशांत शर्मा-मोहम्मद शमीला १-१ विकेट मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये डिन एल्गारने सर्वाधिक ४८ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या इनिंगमध्ये भारताने ६०१/५ रनवर डाव घोषित केला होता. विराट कोहलीने नाबाद २५४ रनची खेळी केली होती, तर मयंक अग्रवालनेही शतक झळकावलं होतं. भारताने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा २७५ रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला.


पहिल्या इनिंगमध्ये अश्विनने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर उमेश यादवला ३ विकेट घेण्यात यश आलं. मोहम्मद शमीला २ आणि रवींद्र जडेजाला १ विकेट मिळाली.


द्विशतकी खेळी केल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या विजयाबरोबरच भारताने ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. या सीरिजची तिसरी मॅच १९ ऑक्टोबरपासून रांचीमध्ये सुरु होणार आहे.