हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिज १२७ रनवर ऑल आऊट झाल्यामुळे भारताला विजयासाठी ७२ रनची गरज होती. भारतानं हे आव्हान १६.१ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पृथ्वी शॉ नाबाद ३३ आणि केएल राहुलही ३३ रनवर नाबाद राहिला. या विजयाबरोबरच भारतानं २ टेस्ट मॅचची ही सीरिज २-०नं खिशात टाकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या मॅचप्रमाणेच भारतानं ही मॅचही तिसऱ्या दिवशीच जिंकली. तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ३०८-४ अशी केली होती. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पंत ८५ रनवर तर रहाणे ७५ रनवर खेळत होता. पण त्यांना शतक करता आलं नाही. पंत ९२ रनवर तर अजिंक्य रहाणे ८० रनवर आऊट झाला. यानंतर अश्विननं ३५ रनचं मोलाचं योगदान दिलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या तर शॅनन गॅब्रियलला ३ आणि जोमेल वॉरिकनला २ विकेट मिळाल्या. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा ३६७ रनवर ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताला ५६ रनची आघाडी मिळाली.


यानंतर पुन्हा बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजचा डाव १२७ रनवर आटोपला. त्यामुळे भारताला विजयासाठी ७२ रनचं माफक आव्हान आलं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या उमेश यादवनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाला ३ विकेट मिळाल्या. आर. अश्विननं २ आणि कुलदीप यादवनं १ विकेट घेतली. वेस्ट इंडिजच्या सुनिल अॅम्ब्रिसनं सर्वाधिक ३८ रन केले.