कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ रन्सनी रोमहर्षक विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ३ वनडे मॅचची ही मालिका २-१नं जिंकली आहे.  भारताच्या ३३८ रन्सचा पाठलाग करताना न्यूझीलंडला ५० ओव्हरमध्ये ३३१/७ बनवता आले. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहनं १० ओव्हरमध्ये ४७ रन्स देऊन ३ विकेट घेतल्या तर युझुवेंद्र चहलला १० ओव्हरमध्ये ४७ रन्सच्या मोबदल्यात २ विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमारनं १० ओव्हरमध्ये तब्बल ९२ रन्स देऊन एक विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडकडून कॉलीन मुन्रोनं ६२ बॉल्समध्ये ७५ रन्स, केन विलियमसननं ८४ बॉल्समध्ये ६४ आणि टॉम लिथमनं ५२ बॉल्समध्ये ६५ रन्स करून न्यूझीलंडचं आव्हान कायम ठेवलं. पण शेवटच्या काही ओव्हरमध्ये चुकीच्या वेळी गमावलेल्या विकेटमुळे न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला.


या मॅचमध्ये टॉस जिंकून न्यूझीलंडनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि रोहित शर्मानं झळकावलेल्या सेंच्युरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला. 50 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ३३७/६ एवढा झाला.


रोहित शर्मानं वनडे कारकिर्दीतली १५वी सेंच्युरी झळकावली. रोहितनं १३८ बॉल्समध्ये १४७ रन्स केल्या. रोहितच्या या इनिंगमध्ये १८ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहली वनडे क्रिकेटमधली ३२वी सेंच्युरी पूर्ण करून आऊट झाला. कोहली १०६ बॉल्समध्ये ११३ रन्स करून आऊट झाला. विराटच्या इनिंगमध्ये ९ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. या सेंच्युरीबरोबरच विराटनं आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9 हजार रन्सचा टप्पा ओलांडण्याचं रेकॉर्ड विराटनं बनवलं आहे. विराटनं 194 इनिंगमध्ये 9 हजार रन्सचा टप्पा पार केला आहे.


रोहित आणि विराटनंतर धोनी आणि केदार जाधवनं झटपट खेळी करून भारताचा स्कोअर ३३७ पर्यंत पोहोचवला. धोनीनं १७ बॉल्समध्ये २५ रन्स तर केदारनं १० बॉल्समध्ये १८ रन्स केल्या.