IND vs SA: तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा विजय; 2-1 च्या फरकाने सिरीजवरही कोरलं नाव
India-South Africa 3rd ODI Highlights : शेवटच्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. यासह टीम इंडियाने 2-1 अशी सिरीजही नावे केली.
India-South Africa 3rd ODI Highlights : गुरुवारी पार्लमध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा केलाय. के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये 2 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश मिळालं आहे.
शेवटच्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 78 रन्सने पराभव केला. यासह टीम इंडियाने 2-1 अशी सिरीजही नावे केली. टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 296 रन्स केले. याच्या प्रत्युत्तरात 45.5 ओव्हरमध्ये अवघे 218 रन्स करू शकली.
संजू सॅमसनने ठोकलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
टॉस गमावल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने 114 बॉल्समध्ये 6 फोर आणि 3 सिक्सेच्या मदतीने 108 रन्स केले. यासह त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतकही झळकावलंय. तिलक वर्मानेही 77 बॉल्समध्ये 52 रन्सचं योगदान दिलं. यावेळी 5 फोर आणि 1 सिक्स लगावली. संजू आणि तिलक यांनी चौथ्या विकेटसाठी 116 रन्सची पार्टनरशिप केली. तिलकने कारकिर्दीतील पहिलं वनडे अर्धशतकही झळकावलंय.
रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये केली फटकेबाजी
यानंतर रिंकू सिंगने 27 बॉल्समध्ये 3 फोर आणि 2 सिक्स लगावत 38 रन्स केले. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने टीमचा स्कोरला 300 च्या जवळ नेण्यात योगदान दिलंय. दक्षिण आफ्रिकेकडून बुरॉन हेंड्रिक्सने 9 ओव्हर्समध्ये 63 रन्स देत 3 विकेट्स घेतले.
अर्शदीपने पटकावले 4 विकेट्स
टीम इंडियाने दिलेल्या 297 रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 45.5 ओव्हर्समध्ये 218 रन्सवर आटोपली. सलामीवीर टोनी डी जोर्जी टीमसाठी सर्वाधिक म्हणजेच 81 रन्स केले. त्याने 87 बॉल्सच्या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स मारले. कर्णधार एडन मार्करामने 36 रन्सने योगदान दिलं. भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने उत्तम गोलंदाजी करत 9 ओव्हर्समध्ये 30 रन्स देत 4 विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना 1-1 विकेट मिळाली.