सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेटनं विजय झाला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी १६५ रनचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान १९.४ ओव्हरमध्ये १६८/४ एवढा स्कोअर करून पूर्ण केलं. या रनचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवननं भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. या जोडीनं ५.३ ओव्हरमध्ये ६७ रनची पार्टनरशीप केली. पण शिखर धवन २२ बॉलमध्ये ४१ आणि मग रोहित शर्मा १६ बॉलमध्ये २३ रन करून आऊट झाला. लोकेश राहुल २० रनवर आणि ऋषभ पंत पहिल्याच बॉलला आऊट झाला. कर्णधार विराट कोहलीनं ४१ बॉलमध्ये ६१ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल आणि एन्ड्र्यू टायनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. एरॉन फिंच आणि डी आर्सी शॉर्टनं ऑस्ट्रेलियाला ८.३ ओव्हरमध्ये ६८ रनची सुरुवात करून दिली. पण यानंतर ऑस्ट्रेलियाला वारंवार झटके लागले. मार्कस स्टॉयनीसनं १५ बॉलमध्ये २५ आणि नॅथन कुल्टर नाईलनं ७ बॉलमध्ये १३ रन करून ऑस्ट्रेलियाला २० ओव्हरमध्ये १६४/६ पर्यंत पोहोचवलं. भारताकडून कृणाल पांड्यानं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. कृणाल पांड्याची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.


तिसऱ्या टी-२०मध्ये विजय मिळवल्यामुळे भारतानं ही सीरिज १-१नं बरोबरीत सोडवली आहे. पहिल्या टी-२०मध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टी-२०मध्ये पावसामुळे सामना रद्द झाला. सीरिज वाचवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं आवश्यक होतं.