नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडनं ठेवलेल्या १५६ धावांचा पाठलाग भारतानं ३४.५ ओव्हरमध्ये केला. याचबरोबर ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवननं सर्वाधिक नाबाद ७५ धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहली ४५ धावांवर आऊट झाला. रोहित शर्मा ११ धावांवर माघारी परतला. शिखर धवनसोबत अंबाती रायुडू १३ धावांवर नाबाद राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यामध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. भारताच्या बॉलरनी न्यूझीलंडला वारंवार धक्के दिले आणि त्यांचा संघ १५७ धावांवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीला ३, युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला एक विकेट मिळाली.


सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबला


क्रिकेटमध्ये अनेकवेळा पावसामुळे खेळ थांबलेला आपण बघतो, पण या मॅचमध्ये सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. बॅटिंग करत असताना शिखर धवनच्या डोळ्यात सूर्यप्रकाश जात असल्यामुळे त्याला बॉल बघायला अडचण येत होती. अखेर अंपायरनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासानंतर खेळ पुन्हा सुरु झाला तेव्हा भारताला डकवर्थ लूईस नियमांनुसार ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान मिळालं.


५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना शनिवार २६ जानेवारीला माऊंट मॉनगुनईमध्ये खेळवण्यात येईल. 


जेव्हा पावसानं नाही तर सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबतो