विशाखापट्टणम : दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. भारताने ठेवलेल्या ३८८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा २८० रनवर ऑलआऊट झाला आहे. कुलदीप यादवची हॅट्रिक आणि इतर भारतीय बॉलरच्या चोख कामगिरीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताकडून कुलदीप आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजाला २ आणि शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. एव्हिन लुईस आणि शाय होप यांनी वेस्ट इंडिजला १० ओव्हरमध्ये ६१ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. पण लुईस ३० रनवर आऊट झाला. शाय होपने सर्वाधिक ७८ रनची खेळी केली. तर निकोलस पूरनने ४७ बॉलमध्ये ७५ रन केले. कीमो पॉलनेही ४२ बॉलमध्ये ४६ रन काढले.


३ मॅचच्या सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं गरजेचं होतं. चेन्नईत झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, पण भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुलने हा निर्णय चुकीचा ठरवला.


रोहित आणि राहुल यांच्यात ओपनिंगसाठी २२७ रनची पार्टनरशीप झाली. रोहितने १३८ बॉलमध्ये १५९ रनची खेळी केली. यामध्ये १७ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. तर राहुल १०४ बॉलमध्ये १०२ रन करुन माघारी परतला. रोहितचं वनडे क्रिकेटमधलं हे २८वं तर राहुलचं तिसरं शतक होतं.


रोहित आणि राहुल यांच्यात मोठी पार्टनरशीप झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली पहिल्याच बॉलला आऊट झाला. पण नंतर भारतीय बॅट्समननी रनचा ओघ सुरुच ठेवला. श्रेयस अय्यरने ३२ बॉलमध्ये ५३ रन आणि ऋषभ पंतने १६ बॉलमध्ये ३९ रन केले. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी ४-४ सिक्स मारल्या. केदार जाधव १० बॉलमध्ये १६ रन करुन नाबाद राहिला.


पंत आणि अय्यर यांनी ४७व्या ओव्हरमध्ये रोस्टन चेसला तब्बल ३१ रन मारले. वनडे क्रिकेटच्या एका ओव्हरमधला भारताचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी १९९९ साली सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा यांनी न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये २८ रन आणि झहीर खान-अजित आगरकरने २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध जोधपूरमध्ये २७ रन केले होते.


वेस्ट इंडिजकडून शेल्डन कॉट्रेलला सर्वाधिक २ विकेट मिळाल्या. तर किमो पॉल, अल्झारी जोसेफ आणि कायरन पोलार्डला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.